पालघर । भाभा अणुसंधान केंद्र तारापूर येथे बोगस प्रवेश पास बनवल्याप्रकरणी सागर महंते याची रवानगी ठाणे तुरुंगात करण्यात आली आहे. बोईसरचे माजी सरपंच भूमाफिया चंद्रशेखर महंते यांचा ठेका भाभा अणुसंधान क्रेंद्र येथे आहे. त्यांचा मुलगा सागर महंते हा तेथील काम बघत होता. सागर महंते यांने बीएआरसी तारापूर येथे सीआयएसएफचे वरिष्ठ अधिकारी यांची नकली सही व शिक्के वापरून कामगारांचे प्रवेश पास बनवले होते. हा प्रकार सीआयएसएफ सुरक्षारक्षकांच्या लक्षात आल्यावर त्याबाबत चौकशीनंतर सागर महंते याला तारापूर पोलिसांनी अटक केली होती. महत्त्वाचे म्हणजे बोगस पास बनवून आठ ते दहा दिवस कामगार हे प्रकल्प परिसरात प्रवेश करून काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, कुचकामी सुरक्षा यंत्रणा असलेल्या प्रकल्पात कोणीही सहज प्रवेश करू शकतो, असे या घटनेनंतर समोर आले आहे.
पोलीसच बगल देत असल्याची चर्चा
गेल्या चार दिवसांपूर्वी तारापूर अणुऊर्जा प्रकल्प 3 व 4 मध्येदेखील कॅन्टींग ठेकेदाराने कामगारांची पोलीस पीव्हीसी न घेतात परप्रांतीय कामगारांना प्रकल्पात प्रवेश दिला होता. याबाबत स्थानिकांना पोलिसांना तक्रार करत रात्रभर पोलिस स्टेशन येथे थांबुन ठेकेदार व त्यांना प्रवेश देणार्या अधिकार्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. परंतु, पोलिसांनीदेखील विषयाचे गांभीर्य लक्षात न घेताच सदर प्रकाराकडे दुर्लक्ष केले होते. अशा बेजबाबदार प्रकारावरून सुरक्षा यंत्रणा एखाद्या मोठ्या घटनेची वाट पाहत आहे का? असा प्रश्न समोर येत आहे. तारापूर येथील प्रकल्पात प्रवेश पास बनवण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालय येथून पीव्हीसी घेणे बंधनकारक असते. परंतु, परप्रांतीय कामगार यांच्या साठी नियमांना पोलीसच बगल देत असल्याचे लोकांमध्ये बोलले जात आहे.