विशेष विमानाने मुख्यमंत्री दिल्लीत पोहोचले, पीएमओकडून पाठविलेला मसुदा अण्णांकडून मंजूर
सातव्या दिवशी 5 हजार शेतकर्यांची रामलीलावर धडक, जेलभरोचा दिला इशारा
नवी दिल्ली : शेतकर्यांच्या महत्वपूर्ण मागण्या, लोकपाल व लोकायुक्तांची नियुक्ती, निवडणूक सुधारणा या प्रमुख मागण्यांसाठी दिल्लीतील रामलीला मैदानावर आमरण उपोषणास बसलेले थोर गांधीवादी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची तब्येत चिंताजनक झाली असून, त्यामुळे केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारची धावपळ उडाली होती. अण्णांनी पाठविलेल्या मागण्यांचा मसुदा पंतप्रधान कार्यालयाने अखेर तत्वतः मान्य करत, मागण्या मान्य केलेला नवीन मसुदा अण्णांना महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यामार्फत पाठविला होता. हा मसुदा अखेर अण्णांनी मान्य केला आहे. त्यामुळे हे उपोषण सोडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुरुवारी विशेष विमानाद्वारे दिल्लीत दाखल झाले होते. त्यांच्याहस्ते उपोषण सोडविले जाणार आहे. दरम्यान, या सत्याग्रह आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी देशभरातील पाच हजार शेतकर्यांनी रामलीला मैदानावर धडक दिली होती. केंद्र सरकारने मागण्या मान्य न केल्यास जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. दुसरीकडे, राळेगणसिद्धी येथेही ग्रामस्थांनी सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला असून, गावातील युवकांकडून आत्मदहनाची तयारी चालविली गेली होती.
सरकार लवकरच उपोषण सोडविणार!
प्रकृती खालावलेल्या अण्णा हजारे यांनी काल एक संदेश जारी करत, आपल्या मागण्या समाजहिताच्या व राष्ट्रहिताच्या आहेत. सोशल मीडियावरून आपल्यावर चिखलफेक केली जात असून, अशी टीका पचविण्याची मला सवय झाली आहे. शेतकरी, समाज आणि राष्ट्रासाठी केलेल्या मागण्या हे सरकार मान्य करत नसेल तर देशासाठी शहीद होण्यास आपण तयार आहोत, असा निर्वाणीचा इशारा हजारे यांनी दिला होता. त्यानंतर देशभरातून हजारो शेतकरी रामलीला मैदानाकडे निघाले आहेत. ज्येष्ठ विधिज्ज्ञ शांती भूषण, करणी सेनेचे प्रमुख कालवी, मेजर हिमांशू यांनीदेखील आंदोलनात सहभाग घेतला. दरम्यान, सरकारी सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान कार्यालयाकडून पाठविण्यात आलेला मसुदा अण्णा हजारे यांनी मान्य केला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत, आणि महाराष्ट्राचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे रामलीला मैदानावर पोहोचून अण्णांचे उपोषण सोडविण्याचा प्रयत्न करणार आहेत. गुरुवारी सकाळी अण्णांनी आंदोलनाच्या कोर कमिटीची बैठक बोलावली होती. या बैठकीत पंतप्रधान कार्यालयातून आलेल्या सुधारित मसुद्यावर चर्चा करण्यात आली. अण्णांच्या प्रकृतीबाबत असलेली चिंता पाहाता, हा मसुदा मान्य करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला होता.
जेलभरो, संसदेला घेरावचा इशारा
रामलीला मैदानावर 23 मार्चपासून उपोषणास बसलेले अण्णा हजारे यांची तब्येत चिंताजनक झालेली आहे. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना बोलण्यास मनाई केली आहे. साडेसहा किलोने त्यांचे वजन घटले असून, रक्तदाबदेखील कमी झाला आहे. तसेच, शरीरातील साखरेची पातळीदेखील वाढली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने मात्र अण्णांची उपेक्षा चालविली असून, महाराष्ट्राच्या जलसंपदामंत्र्यांशी त्यांना वाटाघाटी करायला लावून अण्णांचे वजन कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. या शिवाय, कोणीही बडीहस्ती आंदोलनाकडे फिरकणार नाही याचीही काळजी सरकारकडून घेतली जात आहे. प्रसारमाध्यमांनीदेखील या आंदोलनाकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे सरकारविरोधात शेतकरीवर्गात मोठा रोष निर्माण झाला आहे. गुरुवारी देशभरातून 5 हजार शेतकरी आंदोलनस्थळी जमले असून, त्यांनी जेलभरो आंदोलनाचा इशारा दिला आहे. तसेच, संसदेला घेराव घालण्याचा निर्धारही व्यक्त केला आहे.