अण्णांचे करेंगे या मरेंगे!

2

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसह लोकपाल व लोकायुक्तांच्या नियुक्तीसाठी थोर गांधीवादी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सात वर्षानंतर नवी दिल्लीतील रामलीला मैदानावर पुन्हा एकदा प्राणांतिक उपोषण सुरु केले आहे. या आंदोलनाची सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी शुक्रवारी सकाळी राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांच्या समाधीस वंदन केले. त्यानंतर त्यांनी थेट रामलीला मैदान गाठले. देशातील शेतकरी देशोधडीला लागला असून, शेतकर्‍यांच्या मागण्या केंद्र सरकारला मान्य कराव्या लागतील, तसेच लोकपाल व लोकायुक्तांची नियुक्ती करावीच लागेल, असा इशाराही त्यांनी मोदी सरकारला दिला. या देशातून गोरे इंग्रज निघून गेले आहेत, काळ्या इंग्रजांचे राज्य आले परंतु लोकशाही काही आली नाही. देशवासीयांच्या मागण्यांसाठी मी 42 वेळा या सरकारला पत्र लिहिले. परंतु, सरकारने काहीच उत्तर दिले नाही. त्यामुळे मला हे प्राणांतिक उपोषण करावे लागत आहे. मागण्या मान्य झाल्याशिवाय माघार घेणार नाही, त्यासाठी प्राण गेले तरी बेहत्तर असेही अण्णांनी सरकारला ठणकावले. हे आंदोलन मोडित काढण्यासाठी सरकार दडपशाही करत आहे. रेल्वे व वाहने रोखली आहेत, कार्यकर्त्यांना आंदोलनस्थळी येऊ दिले जात नाही, अशी माहितीही यावेळी अण्णा हजारे यांनी दिली.

आंदोलनस्थळी कडेकोट बंदोबस्त
लोकपाल, लोकायुक्त आणि शेतकर्‍यांचे प्रश्‍न सुटल्याशिवाय आता माघार घेणार नाही, असे सांगून अण्णा हजारे म्हणाले, की 80 व्यावर्षी समाज व देशासाठी मृत्यू आला तर ते मी माझे भाग्य समजेन. हे सरकार हादरले आहे, मंत्री म्हणतात की मागण्या मान्य करत आहोत. परंतु, या लोकांच्या बोलण्यावर विश्‍वास नाही. सरकारने मला जेलमध्ये टाकले तर त्यांचे पतन अटक आहे, असा निर्वाणीचा इशाराही हजारे यांनी दिला. दीर्घ आंदोलनाचे संकेत देताना अण्णा म्हणाले, शरीरात प्राण असेपर्यंत मागण्यांचा पाठपुरावा करत राहू, सरकारशी बोलत राहू. या वयात हृदयविकाराने मरण आल्यापेक्षा शहीद होणे कधीही चांगले, असेही त्यांनी ठणकावले. रामलीला मैदानाकडे देशभरातून कार्यकर्त्यांनी कूच केली असून, दिल्ली पोलिसांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. रामलीला मैदानाच्या चारहीबाजूने निमलष्करी दल व पोलिस तैनात करण्यात आलेले आहेत. प्रत्येक शक्यतेशी सामना करण्यासाठी पोलिस सज्ज झालेले आहेत. मेटल डिटेक्टरमधून गेल्यानंतरच आंदोलकांना मैदानावर सोडले जात होते.

सरकारकडून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न
राजघाट येथे गांधीजींच्या समाधीस्थळी जाण्यापूर्वी अण्णा हजारे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, आंदोलनात येणार्‍या लोकांशी हे सरकार गैरवर्तवणूक करत आहे. त्यांना आंदोलनात येण्यापासून रोखले जात आहे. आमच्या आंदोलनात खोडा घालण्याचा प्रयत्न होत असून, आंदोलन दडपण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे. आजपर्यंत आमच्या आंदोलनात कधीच हिंसाचार झालेला नाही. पण, सरकारला काय अनुभूती आली माहित नाही, आंदोलकांच्या बसेस आणि रेल्वे रोखल्या जात आहेत. काही रेल्वेगाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. लोकशाहीसाठी हे घातक आहे, असा आरोपही अण्णांनी मोदी सरकारवर केला. देश व लोकशाहीसाठी शहीद भगतसिंग यांनी बलिदान दिले. परंतु, अजूनही देशात लोकशाही आली नाही, अशी खंतही अण्णांनी व्यक्त केली. देशभरातून मोठ्या संख्येने आंदोलक रामलीला मैदानावर पोहोचत असून, विविध राज्यांतून शेतकरी मोठ्या संख्येने दिल्लीत आलेले आहेत. या आंदोलनात शेतकरीप्रश्‍नी सरकारशी आरपारची लढाई लढली जाईल, असा इशाराही अण्णांनी दिलेला आहे.

काय म्हणाले अण्णा हजारे…
1. कृषिमूल्य, निवडणूक, नीती यासारख्या आयोगांवरील सरकारी नियंत्रण हटवा, त्यांना काम करू द्या.
2. ज्या शेतकर्‍याला आधार नाही त्या 60 वर्षावरील शेतकर्‍याला 5 हजार रुपये पेन्शन द्या.
3. संसदेत शेतकरी विधेयक पारित करा. प्रत्येकाला जगण्याचा अधिकार द्या.
4. खासदारांची वेतनवाढ करण्याची गरज काय?
5. मला पोलिस संरक्षण नको, असे अनेकदा पत्र लिहून कळवले. तरीही जबरदस्तीने पोलिस फोर्स तैनात करण्यात आला.
6. रेल्वे गाड्या रद्द करून सरकार शेतकर्‍यांना भडकावत आहे. त्यांनी हिंसा करावी असाच सरकारचा हेतू दिसतो.

सरकारच्या वाटाघाटी निष्फळ
लोकसभा निवडणुकीत आश्‍वासन देऊनही केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने लोकपाल आणि लोकायुक्तांची नियुक्ती केली नाही. त्यामुळे सरकारविरोधात बेमुदत आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. या आंदोलनाला काँग्रेसनेही पाठिंबा दिला आहे. या आंदोलनात स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी आणि शेतकर्‍यांना हमीभाव देण्याची मागणीही करण्यात आली. अण्णांनी आंदोलन करू नये म्हणून भाजपने बरेच प्रयत्न केले. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी अण्णांची भेट घेऊन त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला होता. केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनीही काल रात्री अण्णांसोबत महाराष्ट्र सदनात चर्चा केली. मध्यरात्रीपर्यंत या वाटाघाटी सुरू होत्या. मात्र अण्णांनी त्यांना प्रतिसाद दिला नसल्याने भाजपचे सर्व प्रयत्न व्यर्थ गेले.