राळेगणसिद्धी : लोकपाल विधेयकाची अमलबजावणी करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार टाळाटाळ करत असल्याबद्दल थोर गांधीवादी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. येत्या 23 मार्च 2017 रोजी शहिद दिनी आंदोलन करण्याची घोषणा हजारे यांनी केली आहे.
लोकपालच्या अमलबजावणीसाठी अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी वारंवार पत्रव्यवहार केला. परंतु, अण्णांच्या पत्रांना मोदींनी केराची टोपली दाखविली. त्यामुळे अण्णा हे मोदींवर नाराज आहेत. यापूर्वी त्यांनी फेब्रुवारीमध्ये आंदोलनाची हाक दिली होती. परंतु, राज्यभरातील कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यांनी शहिददिनी म्हणजे 23 मार्च 2018 रोजी आंदोलन करणार असल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे. आंदोलनाच्या जागेबाबत सरकारबरोबर पत्रव्यवहार सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले. रामलीला मैदान, जंतर मंतर किंवा शहीदपार्कवर आंदोलन करू, असेही अण्णा म्हणाले. लोकपाल लागू करण्याबाबत मोदी सरकार उदासीन असून, याबाबत अनेकवेळा मोदींशी पत्रव्यवहार केला आहे. मात्र, मोदी काहीच प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळेच आंदोलनाचे हत्यार उपासले आहे, असेही अण्णा म्हणाले. आंदोलनाच्या जनजागृतीसाठी अण्णांनी नुकताच ओदिशा दौरा केला होता. तर मार्चपर्यंत देशभर फिरून ते जनजागृती करणार आहेत.