अहमदनगर-लोकपाल व लोकायुक्तच्या नियुक्तीच्या मागणीसाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे आजपासून राळेगणसिद्धीत उपोषणाला बसले आहे. दरम्यान लोकायुक्तांच्या चौकशीच्या कार्यकक्षेत मुख्यमंत्र्यांचा समावेश करण्याचा अत्यंत महत्वाचा निर्णय कॅबिनेटने घेतला आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या सुमारे ८० ते ९० टक्के मागण्या या मान्य झाल्या आहेत, त्यांनी वय व तब्येत पाहून उपोषण मागे घ्यावे असे आवाहन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.
अण्णा हजारेंच्या मागणीवर अजूनही त्यांच्याशी बोलणी सुरू आहेत. तरीही अण्णा उपोषणावर ठाम आहेत. येत्या एक-दोन दिवसांत याबाबत अण्णांची भेटू घेऊ असे महाजन यांनी सांगितले.
लोकपाल व लोकायुक्त नियुक्तीच्या मागणीसाठी अण्णा हजारे हे बेमुदत उपोषणास बसले आहेत. लोकायुक्त नियुक्त करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाला असला तरी विधानसभेच्या मंजुरीशिवाय त्याचे कायद्यात रूपांतर होणार नसल्याने आपण आंदोलनावर ठाम असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, महाजन बुधवारी अण्णांची भेट घेणार होते. पण अण्णांचा उपोषणाबाबतचा आक्रमक पवित्रा पाहता त्यांनी राळेगणसिद्धीला येण्याचे टाळल्याचे बोलले जात आहे.