अण्णाद्रमुककडून शशिकला, दिनकरनची हकालपट्टी

0

चेन्नई। तामिळनाडूतील राजकीय वातावरण सध्या भलतेच तापलेले आहे. पोटनिवडणूक रद्द झाल्यानंतर अण्णाद्रमुकमधील दोन्ही गटांचे एकत्र येण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. पोटनिवडणुकीच्या पार्श्‍वभूमिवर घडलेल्या घटनांमुळे मंगळवारी झालेल्या बैठकीत शशिकला आणि दिनकरनला हटवण्याचा निर्णय घेतला. शशिकला आणि तिच्या कुटुबियांची पक्षातून करण्यात आलेली हकालपट्टी हा आमचा पहिला विजय असल्याची प्रतिक्रिया तामीळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि अण्णाद्रमुकचे नेते ओ पनीरसेल्वम यांनी दिली.

तामीळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या पश्‍चात त्यांच्या निकटवर्तीय शशिकला यांच्याकडे पक्षाची सूत्र जाताच अण्णाद्रमुकमध्ये दोन गट पडले होते. राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री के. पलानीस्वामी आणि माजी मुख्यमंत्री पनीरसेल्वम या गटांचे नेतृत्व करत आहेत. शशिकला आणि तिचा भाचा दिनाकरनला पक्षाबाहेर काढण्याच्या अटीवर पनीरसेल्वम यांनी तडजोडीची तयारी दाखवली होती. आता लवकरच आम्ही बैठक करून आमच्यातील मतभेद मिटवू असे पनीरसेल्वम यांनी सांगितले. दरम्यान, पक्षातून हकालपट्टी झाल्यावर शशिकला आणि दिनकरनला मानणारे आमदारही सक्रिय झाले असून त्यांच्या गटानेही मॅरेथॉन बैठक घेतली होती.

दिनकरन यांचाही गट
पार्टीतून हकालपट्टी झालेली असतानाही शशिकला यांचे निकटवर्ती टीटीवी दिनकरन यांनी पार्टीच्या आमदारांची बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्री इ के पलानीस्वामी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील इतर सहकार्‍यांनी शशिकला आणि दिनकरन यांच्या विरोधात बंडाचे निशाण फडकवल्यानंतर ही बैठक बोलावण्यात आली. पी. वेत्रिवल, थंगा तमिलसेवन यांच्यासह सहा आमदारांनी दिनकरन यांची पाठराखण केली आहे.

पनीरसेल्वम गटाच्या बैठकी सुरू
जयललिता यांचे विश्‍वासू असलेले माजी मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांचा गट राज्यातील राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवून आहे. शशिकला आणि दिनकरनची हकालपट्टी झाल्यामुळे पलानी स्वामी आणि त्यांचा गट एकत्र येऊ शकतो असे विधान पनीरसेल्वम यांनी केले आहे. पनीरसेल्वम यांनी जयललिता अटकेत असताना मुख्यमंत्रीपद सांभाळले होते. जयललितांच्या निधनानंतरही त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती.

दुसरे बंड
अण्णाद्रमुकच्या सर्वेसर्वा जयललिता यांच्या निधनानंतर पक्षात दोन वेळा बंड झाले. गतवर्षी डिसेंबर महिन्यात जयललिता यांचे निधन झाले. त्यानंतर पनीर सेल्वम यांनी जबरदस्तीने मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा घेतल्याचा आरोप करत शशिकला यांच्या विरोधात बंड केले होते. त्यानंतर आता विद्यमान मुख्यमंत्री पलानी स्वामी यांनी शशिकलाच्या विरोधात बंड केले.

दिनकरन अडचणीत
दिल्ली पोलिसांनी पक्षाचे अधिकृत निवडणूक चिन्ह मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाला लाच देण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून दिनकरन याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अण्णाद्रमुकमधील दोन गट एकत्र येण्याची परिस्थिती निर्माण झाली असताना दिल्ली पोलिसांनी दिनकरन याच्याविरोधात लूकआऊट नोटीस दिली आहे. पार्टीचे दोन पानांचे चिन्ह मिळण्यासाठी दिनकरनने सुकेश चंद्रशेखर यांना 60 कोटी रुपयांची लाच देण्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी चंद्रशेखरला 30 कोटी रुपये घेताना अटक केली होती. चंद्रशेखर सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याची चौकशी सध्या पोलीस करत आहेत. मिळकतीपेक्षा जास्त संपत्तीपेक्षा बाळगल्याप्रकरणी शशिकला सध्या बेंगळुरू कारागृहात आहे. कारागृहातून दिनकरन मार्फत त्या पक्ष सांभाळत होत्या.