चेन्नई । तामीळनाडूत होत असलेल्या आगामी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सत्तेत असलेल्या एआयएडीएमकेचे असलेले दोन पानांचे निवडणूक चिन्ह गोठवले आहे. या पोटनिवणुकीसाठी निवडणूक आयोगाने एआयएडीएमकेमध्ये असलेल्या दोन गटांना वेगवेगळी नावे आणि चिन्हे दिली आहेत. त्यामुळे जयललिता यांच्या मृत्यूनंतर रिक्त झालेल्या डॉ. राधाकृष्णन नगर विधानसभा मतदार संघात होत असलेल्या पोटनिवडणुकीत दोन्ही गटांना पहिल्यांदाच नविन नाव आणि चिन्हासह नशीब अजमावे लागेल. पक्षाचे नाव आणि चिन्ह वापरण्यावरून झालेल्या वादावर अंतिम निर्णय घेण्याआधी ही पर्यायी व्यवस्था असल्याचे निवडणूक असल्याचे सांगितले.
निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार एआयडीएमके पक्षावर अधिकार सांगणार्या शशिकला यांच्या गटाला आता ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कडगम (अम्मा) या नावाने ओळखले जाईल. निवडणूक आयोगाने त्यांना टोपी हे निवडणूक चिन्ह दिले आहे. तर माजी मुख्यमंत्री पनीर सेल्वम यांच्या गटाला ऑल इंडिया अन्ना द्रविड मुन्नेत्र कडगम पूरची थैलवी अम्मा या नावासह रस्त्यावरील विजेचा खांब हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. दोन्ही गटांनी गुरुवारी सकाळी 10 वाजता दोन्ही गटांनी नाव आणि चिन्हांचे तीन पर्याय निवडणूक आयोगासमोर सादर केली. आयोगाच्या बैठकीदरम्यान शशिकला गटाने ऑटो रिक्षा, बॅट आीन टोपी असे तीन पर्याय दिले होते. त्यातील ऑटोरिक्षाचा पर्याय निवडणूक आयोगाने मान्य केला होता. पण, त्यानंतर शशिकला गटाने अपिल करीत टोपी चिन्हाची मागणी केली. ती निवडणूक आयोगाने मान्य केली.
दाव्यासाठी 20 हजार पानांचा दस्ताऐवज
निवडणूक आयोगासमोर बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान दोन्ही गटांनी सुमारे 20 हजार पानांचे दस्ताऐवज आणि साक्षीदार सादर केले. शशिकला आणि टी.टी.व्ही.दिनकरणने पक्षावर एकाधिकार असल्याचा दावा केला. त्यासाठी त्यांनी पक्षाचे सर्व आमदार, खासदार आणि पदाधिकारी त्यांच्यासोबत असल्याचे निवडणूक आयोगाला सांगितले. शशिकला गटाचा दावा खोडत पनीरसेल्वम यांच्या गटानेही आपली दावेदारी सांगितली. पनीरसेल्वम गटाने शशिकला गटाने निवडणुकीची थट्टा उडवल्याचे सांगत पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा सांगितला. निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि चिन्ह गोठवल्यामुळे दोन्ही गटांचे धाबे दणाणले आहेत.
8 एप्रिलला आहे पोटनिवडणूक
डॉ. राधाकृष्णननगर विधानसभा मतदार संघात 8 एप्रिलला पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शशिकला आणि पनीरसेल्वम यांच्या गटाने पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्हावर दावा सांगितला होता. बुधवारी रात्री दोन्ही गटांमध्ये झालेल्या वादामुळे निवडणूक आयोगाने पक्षाचे मूळ नाव ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कडगम आणि दोन पानांचे निवडणूक चिन्ह बाद केले.