जुन्नर । अण्णाभाऊंचे साहित्य श्रेष्ठ दर्जाचे असून अण्णांच्या लेखन साहित्याने समाजाला जीवन जगण्याची योग्य दिशा दिली, असे प्रतिपादन जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांनी केले. हलगीसम्राट केरबा पाटील फाउंडेशन कार्यालय सभागृह नारायणगाव येथे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा 97वा जयंती सोहळा तसेच राष्ट्रीय बहुजन विकास महासंघाचा सातव्या वर्धापन दिनानिमित्ताने आयोजित पुरस्कार वितरण, सत्कार सोहळा, प्रबोधनपर व्याख्यान तसेच बहारदार लावण्यांच्या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.
साहित्यिक प्रकाश पवार यांचे व्याख्यान
यावेळी अण्णाभाऊंचे समाजासाठी मोठे योगदान असून ते कुणीही विसरून चालणार नाही. त्यांचा वारसा आपण समर्थपणे पुढे चालविला पाहिजे, असे मत जिल्हा परिशद सदस्या आशा बुचके यांनी व्यक्त केले. तसेच अण्णा भाऊंची जयंती नाचून साजरी करण्यापेक्षा वाचून साजरी करावी. अण्णा भाऊंचे साहित्य समृद्ध असून त्यातून खूप शिकण्यासारखे आहे. असे विचार नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक अजय गोरड यांनी मांडले. यानंतर ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक प्रकाश पवार यांनी आपल्या प्रबोधनपर व्याख्यानातून अण्णा भाऊंचा जीवनप्रवास उलगडला.
साहित्यरत्न पुरस्काराने मान्यवरांचा गौरव
या कार्यक्रमासाठी विघ्नहरचे संचालक संतोष खैरे, रा. ब. वि. महासंघाचे संस्थापक, अध्यक्ष बाळासाहेब मांडे, नारायणगाव ग्रामपंचायत सदस्य योगेश (बाबू) पाटे, आशिष माळवदकर, प्रसिद्ध उद्योजक संजय वारूळे, वारूळवाडीचे उपसरपंच जंगल कोल्हे, नारायणगाव शिवसेना शहराध्यक्ष संतोष दांगट, सामाजिक कार्यकर्ते मेहबूब काझी, हलगी सम्राट केरबा पाटील फाउंडेशनचे संस्थापक/अध्यक्ष काशिनाथ आल्हाट, प्रसिद्ध बैलगाडा मालक एकनाथ कसबे आदी मान्यवर उपस्थित होते. फाउंडेशनच्या वतीने मीरा दळवी, आतांबर शिरढोणकर, शारदा गावडे, संजय वारुळे यांना साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे पुरस्कार 2017 ने सन्मानित करण्यात आले.