अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न द्यावे

0

भगवान वैराट यांचे आवाहन; अभिवादन सभा व गुणवंतांच्या गुणगौरव समारंभ

हडपसर – अजरामर साहित्य, स्वातंत्र्यलढ्याबरोबरच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अतुलनीय योगदान देऊन अखेरच्या श्‍वासपर्यंत अत्यंत प्रामाणिक व निःस्वार्थी भावनेने लोकाभिमुख जीवन जगलेले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे ‘भारतरत्न’ मिळवणार्‍या व्यावसायिकांच्या तुलनेत नक्कीच उजवे ठरतात आणि म्हणूनच अण्णाभाऊंना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्काराने गौरविण्यात यावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष भगवानराव वैराट यांनी केले.

हडपसर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संघ व महाराष्ट्र झोपडपट्टी सुरक्षा दल यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अभिवादन सभेत गुणवंतांच्या गुणगौरव समारंभात ते बोलत होते.

याप्रसंगी विरोधी पक्षनेते चेतन तुपे, निलेश मगर, नगरसेविका हेमलता मगर, दत्तात्रय तुपे, महंमद शेख, संतोष खरात, सुनील गोगावले, राजेंद्र तुपे, बाळासाहेब तुपे, प्रा. डॉ. किरण रणदिवे, बाळासाहेब सुपेकर, अनिल खरात, नितीन बोराडे आदी उपस्थित होते.

प्रास्ताविक बाळासाहेब सुपेकर यांनी केले. सूत्रसंचालन स्वप्नील रासकर यांनी केले तर आभार गणेश जाधव यांनी मानले. कार्यक्रमाचे संयोजन प्रताप कांबळे, शिवाजी वाव्हुळ, दादा गायकवाड, संतोष पठारे, महादेव भोवाळ, धनाजी सकट, नितीन कांबळे, अमोल लोंढे, दीपक गायकवाड, सचिन भोरे, बाळासाहेब गायकवाड आदी कार्यकर्त्यांनी केले.

20 लाखांची तरतूद करणार
लवकरच नाट्यगृहाचे उर्वरित काम पूर्ण करण्याबरोबरच पुढील वर्षांपासून हडपसर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महोत्सवासाठी तसेच अण्णाभाऊंच्या नावाने सुसज्ज ग्रंथालयाच्या उभारणीसाठी 20 लाख रुपयांची भरीव तरतूद करण्याबाबतचा प्रस्ताव मंजूर करण्यात येईल.- चेतन तुपे, विरोधी पक्षनेते

नुकताच आंतरराष्ट्रीय बुरशी विषयातील संशोधनाबद्दलचा मायकॉलॉजिकल सोसायटी ऑफ अमेरिका या संस्थेतर्फे दिला जाणारा मार्टिन बेकर हा बहुमान मिळवणारे पहिले भारतीय होण्याचा मान प्राध्यापक डॉ. किरण रणदिवे यांना मिळाला असून त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याबरोबरच मुस्कान पठाण, साक्षी रुपनवर, अंकुश जाधव, ओंकार दळवी, आकांक्षा शेंडगे, ओंकार सगट या गुणवंत विद्यार्थ्यांनाही गौरविण्यात आले.