पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरातील प्रभाग क्रमांक 13 मधील लोकशाहिर अण्णाभाऊ साठे वसाहतीमध्ये स्वच्छ पाणीपुरवठा करण्याची मागणी नागरिक करीत आहे. या परिसरामध्ये चक्क पिण्याच्या पाण्यात आळ्या आढळल्या आहेत. त्यामुळे या प्रकाराची तात्काळ दखल घेऊन महापालिकेने त्वरित स्वच्छ पाणीपुरवठा केला पाहिजे. या परिसरात दाट लोकवस्ती आहे. मात्र गेल्या तीन ते चार दिवसांपासून अशुध्द पाणीपुरवठा होतो आहे. या भागातील नळांमधून दूषित पाणी येत आहे. त्यामुळेच नागरिक हवालदिल झाले आहेत.
नागरिकांना पिण्याच्या पाण्यातून जंतू, अळ्या, किडे आल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या पाण्याची दुर्गंधी येत असून यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अशुद्ध पाण्यामुळे कॉलरा, अतिसार, हगवण, कावीळ, टायफॉईड (विषमज्वर) डेंगू, मलेरिया, चिकनगुनिया, अतिसार, ताप, सर्दी, खोकला व फ्ल्यु सारखे आजार बळावण्याची शक्यता आहे. दूषित पाणी पुरवठ्यामूळे इथल्या नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून महापालिकेने तातडीने ही समस्या सोडविली पाहिजे. अन्यथा या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे.