अण्णासाहेब पाटील यांनी माथाडी कामगारांसाठी केलेले कार्य दीपस्तंभासारखे

0

महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष इरफान सय्यद यांचे प्रतिपादन

पिंपरी : काबाड कष्टाने आणि अंगमेहनतीने जीवन जगणार्‍या राज्यातील लाखो माथाडी कामगारांच्या जीवनास स्थिरता व स्थैर्य कै. अण्णासाहेब पाटील यांनी मिळवून दिले. त्यांनी तमाम गरीब माणसांच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष केला. गोरगरीब जनतेला स्वाभिमानाने जगता यावे, यासाठी अण्णासाहेब यांनी केलेले कार्य एका दीपस्तंभासारखे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष व कामगार नेते इरफान सय्यद यांनी केले. महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या वतीने कष्टकरी माथाडी कामगारांचे दैवत कै. अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी चिंचवड येथील त्यांच्या अर्धाकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

यांची होती उपस्थिती
यावेळी महाराष्ट्र मजदूर संघटनेचे उपाध्यक्ष खंडू गवळी, मुरलीधर कदम, अशोक सांळुखे, ज्ञानोबा मुजुमले, भिवाजी वाटेकर, कार्याध्यक्ष परेश मोरे, सतीश कंठाळे, सल्लागार बाळासाहेब शिंदे, सहसचिव सर्जेराव कचरे, पांडुरंग कदम, प्रवीण जाधव, गोरक्षनाथ दुबले, संतोष जाधव, मारुती कौदरे, मारुती वाळूंज, संदीप मधुरे, पांडुरंग काळोखे, नागेश व्हनवटे, संतोष माशेरे आदी उपस्थित होते.

माथाडी कामगारांना एकीचे बळ
इरफान सय्यद पुढे म्हणाले, माथाडींचे आराध्य दैवत कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांनी गोरगरीब जनतेला स्वाभिमानाने जगता यावे यासाठी केलेले कार्य एका दीपस्तंभासारखे आहे. त्यांनी माथाडी कामगारांना एकीचे बळ दिले. मेहनतीचे, हमालीचे काम करणार्‍या कामगारांना त्यांनी प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांच्या कौटुंबिक आर्थिक, सामाजिक जीवनात आमुलाग्र बदल करण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांचे कार्य समाजासाठी नेहमीच प्रेरणादायी राहील, असे ते म्हणाले.

संघटना अशीच मजबूत ठेवा
कष्टकरी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र मजदूर संघटना अण्णासाहेब पाटील यांच्या विचाराने काम करत आहे. त्यांनी दिलेले आदर्श आणि शिकवण यातूनच कामगारांचे कल्याण होत आहे. गरीब, माथाडी कामगारांसाठी पिंपरी-चिंचवड शहरात संघटना गृहप्रकल्प राबविणार आहे. माथाडी कामगारांना लवकरच अल्प दरात घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. माथाडी कामागारांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी महाराष्ट्र मजदूर संघटना सैदव तत्पर आहे. पदाधिकार्‍यांनी संघटना अशीच मजबूत ठेवावी, असे आवाहनही सय्यद यांनी केले.