अण्णा भाऊ साठेंचे साहित्य प्रेरणादायी : सुभाष सरोदे

0

पिंपरी-चिंचवड : लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या साहित्यातून जगण्यातील संघर्ष आणि संघर्षातून मिळविता येणारे यश, याचे गमक सापडते. त्यामुळे जातीचे वारस न होता महापुरुषांच्या विचारांचे वारस होत अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य आवर्जून वाचा, असे आवाहन भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सचिव सुभाष सरोदे यांनी विद्यार्थ्यांना केले. थेरगाव येथील खिंवसरा पाटील शाळेत अण्णा भाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यांची होती उपस्थिती
यावेळी लोकप्रबोधनी कला मंचचे अध्यक्ष आसाराम कसबे, सदस्य बालाजी मोरे, शिवाजी पोळ, राजेश अरसूळ, सामाजिक कार्यकर्ते जनार्दन वाठारकर, मुख्याध्यापक नटराज जगताप आदी उपस्थित होते.

साहित्याचा संच शाळेला भेट
अण्णा भाऊ साठे यांचे प्रेरणादायी साहित्य नवीन पिढीला उपलब्ध करून देता यावे, म्हणून 2020 ला अण्णा भाऊ साठेंच्या होणार्‍या जन्म शताब्धीनिमित्त तीन वर्षात महाराष्ट्रातील विविध शंभर शाळांना लोकप्रबोधिनी कला मंचच्या वतीने अण्णा भाऊंच्या साहित्याचा संच भेट देण्याचे उद्दिष्ट आहे. त्याचा शुभारंभ या जयंतीला खिंवसरा पाटील शाळेपासून करण्यात आला. फकिरा, वारणेचा वाघ, अपघात, पाझर, संघर्ष, अहंकार, अग्निदिव्य, फुलपाखरू, आग, रानबोका, गुर्‍हाळ, आवडी, गजाड, अमृत, स्वप्नसुंदरी, देशभक्त घोटाळे, माझा रशियाचा प्रवास (प्रवास वर्णन) इत्यादी 30 पुस्तकांचा संच विद्यार्थ्यांसाठी शाळेला भेट देण्यात आला.