पिंपरी-चिंचवड : महापालिकेच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या जयंती महोत्सवानिमित्त 1 ते 5 ऑगस्ट या कालावधीत विविध सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती महापौर नितीन काळजे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. निगडीतील भक्ती-शक्ती चौकात होणार्या महोत्सवाचे उद्घाटन मंगळवारी (दि. 1) सायंकाळी सहा वाजता पालकमंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते होणार आहे.
मंगळवारी सकाळी मिरवणूक
महोत्सवाच्या प्रारंभी मंगळवारी (दि. 1) सकाळी सव्वादहा वाजता निगडीतील अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास तर साडेदहा वाजता महापालिका मुख्यालयातील प्रतिमेस महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येईल. त्यानंतर सकाळी साडेदहा वाजता मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर ज्ञानप्रबोधन कलामंच प्रस्तुत ‘शाहिरी जलसा’ चंदन कांबळे आणि सहकारी सादर करणार आहेत. सकाळी साडेअकरा वाजता पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते निगडी येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुतळा परिसर दरम्यान मिरवणूक काढण्यात येईल. दुपारी साडेबारा वाजता प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम पल्लवी घोडे तर दुपारी दोन वाजता ‘गरजला सिंहाचा छावा’ हा शाहिरी जलसा कार्यक्रम शाहीर बापू पवार सादर करणार आहेत. त्यानंतर भव्य बॅण्ड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी सहा वाजता महोत्सवाचे उद्घाटन होईल. रात्री आठला प्रभा एंटरप्रायजेस, शैलेश लेले प्रस्तुत ‘महाराष्ट्राचा शाहिरी बाणा’ हा कार्यक्रम सादर होणार आहे.
बुधवारी ढोल-लेझीम स्पर्धा
बुधवारी (दि. 2) सकाळी आठला भव्य ढोल लेझीम स्पर्धा होणार आहे. सकाळी साडेदहा वाजता प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम सुमेध कल्हाळीकर सादर करतील. दुपारी साडेबारा वाजता महिला बचतगट मेळावा व मार्गदर्शन कार्यक्रम होणार आहे. दुपारी दोन वाजता महिलांसाठी ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रम, सायंकाळी पाच वाजता अण्णा भाऊ साठेंच्या साहित्याचे विविध पैलू या विषयावर परिसंवाद होईल. त्यात प्रा. नामदेवराव जाधव, अश्विनी सातव, प्रा. शरद गायकवाड, डॉ. प्रभाकर देसाई, प्रा. किरण चक्रे, अशोक कांबळे यांचा सहभाग असणार आहे. सायंकाळी सात वाजता मल्लेश आर्टस् प्रस्तुत शैलेश लोखंडे यांचा ‘शांताबाईचा जलवा’ हा कार्यक्रम होणार आहे.
गुरुवारी सांस्कृतिक कार्यक्रम
गुरुवारी (दि. 3) सकाळी साडेदहा वाजता प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम, दुपारी साडेबारा वाजता ‘जागर रयतेचा’ हा समाजप्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम महादेव खंडागळे तर दुपारी दोन वाजता ‘मैफील ए सदाबहार’ हा गीतांचा कार्यक्रम अमोल भोसले सादर करणार आहेत. सायंकाळी चारला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य व त्यांना आणि त्यांच्या साहित्याला मिळालेला न्याय या विषयावर चर्चा होणार आहे. यामध्ये पद्मश्री लक्ष्मण माने, डॉ. तुकाराम रोंगटे, सुरेश चौथाईवाले, प्रा. चंद्रकांत वानखेडे, प्रकाश रोकडे, प्रा. गणेश चंदनशिवे, गणेश क्षीरसागर, मनोज तोरडमल सहभागी असणार आहेत. सायंकाळी सात वाजता ’तुफान साहित्याचे’ हा प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम होणार आहे.
विविध विषयांवर स्पर्धा
शुक्रवार (दि. 4) सकाळी साडेदहा वाजता ‘अण्णा भाऊंचे लिखाण व अण्णा भाऊंच्या साहित्यातील नायक व नायिका’ या विषयावर वक्तृत्त्व स्पर्धा’ तसेच ‘अण्णा भाऊ साठे व संयुक्त महाराष्ट्राची चळवळ’ या विषयावर निबंध स्पर्धा, रांगोळी, चित्रकला व नृत्य स्पर्धा घेण्यात येणार आहेत. दुपारी अडीच वाजता लखन आडागळे समाजप्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम सादर करतील. सायंकाळी चार वाजता अनिकेत जवळेकर यांचा ‘जल्लोष मराठमोळ्या लावण्यांचा’ हा कार्यक्रम सादर होईल. त्यानंतर समाजाच्या उन्नतीस, सद्यस्थिती व प्रगतीचे मार्ग या विषयावर परिसंवाद होणार आहे. या परिसंवादामध्ये भाऊसाहेब आडागळे, संदिपान झोंबाडे, प्रभाकर लोंढे, प्रा. प्रदीप कदम, के. वाय. कांबळे, धनंजय भिसे, रमेश भोसले यांचा सहभाग असणार आहे. सायंकाळी आठला प्रसिद्ध गायक नंदेश उमाप प्रस्तुत ‘संगीतरजनी’ हा प्रबोधनपर गीतांचा कार्यक्रम सादर होणार आहे.
शनिवारी महोत्सवाची सांगता
शनिवार (दि. 5) सकाळी साडेदहा वाजता कविसंमेलन होणार असून, दुपारी साडेबारा वाजता प्रभाकर पवार, थिएटर वर्कशॉप कंपनी प्रस्तुत ‘वारणेचा वाघ’ या समाजप्रबोधनपर नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी अडीच वाजता उल्हास तुळवे प्रस्तुत ऑर्केस्ट्रा सादर होईल. सायंकाळी साडेचार वाजता रमेश पांडव यांचे व्याख्यान, सायंकाळी साडेपाच वाजता ज्येष्ठ रंगकर्मी, नाटककार व लेखक उत्तम बंडू तुपे यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे कलारत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यानंतर राज्याचे सामाजिक, न्याय आणि विशेष सहाय्य राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या उपस्थितीत महोत्सवाचा समारोप व बक्षीस वितरण होईल. सायंकाळी सात वाजता ऑर्केस्ट्रा म्युझिकल स्टार्स या कार्यक्रमाने महोत्सवाची सांगता होणार आहे.