पिंपरी-चिंचवड : ‘आई मायेची सावली’, ‘प्रत्येकाने नेत्रदान अगदी निसंकोच करावे’, ‘अण्णा भाऊ साठे, काय वर्णावी तुमची महती’, ‘मातीतून सोने पिकवणार्यांची कत्तले होतात काय’, अशा एकाहून एक सरस कविता सादर करत कवी मंडळींनी सामाजिक विषयांना हात घातला. प्रत्येक कवितेला श्रोत्यांकडून दाद मिळत होती. निमित्त होते; महापालिकेच्या वतीने साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सवानिमित्त शनिवारी आयोजित ‘काव्यकट्टा’ कविसंमेलनाचे. निगडीतील भक्ती-शक्ती येथे ही काव्य मैफल रंगली होती. या कविसंमेलनाचे अध्यक्षपद सुप्रसिद्ध कवी म. भा. चव्हाण यांनी भुषविले.
या कवींचा सहभाग
या कविसंमेलनामध्ये कवी म. भा. चव्हाण, आकाश सोनवणे, अनिल दीक्षित, दीपेश सुराणा, राज आहेरराव, नंदकुमार कांबळे, किशोर केदारी, दत्तू ठोकळे, सुहास घुंमरे, राजेंद्र घावटे, महेंद्र पाटोळे, संगीता झिंजुरके, पितांबर लोहार, सुनील भिसे, सिद्धार्थ भोसले, समिंदर घोक्षे, विनोद अष्ठुळ, मधुश्री ओव्हाळ, नीलेश म्हसाये, तुकाराम पाटील, रघुनाथ पाटील, विनिता पिसाळ, प्रभाकर वाघोले, आय. के. शेख, सुमन दुबे, महेंद्रकुमार गायकवाड, संतोष फंड, संदीप साकोरे, प्रदीप गांधलीकर, नितीन चंदनशिवे, विशाल कसबे, प्रल्हाद शिंदे, के. एस. पाटोळे, शिवाजी सावळे, धनंजय भिसे, अजय पाताडे या कविंनी सहभाग नोंदविला.
श्रोत्यांची वाहवा
कवी नंदकुमार कांबळे यांनी ‘अंधार’ ही कविता सादर केली. यामध्ये जीवनात नेत्रदानाचे महत्त्व सांगताना ते म्हणतात, प्रत्येकाने नेत्रदान अगदी निसंकोच करावे, म्हणतात ना; मरावे परी नयनरुपी उरावे…, कवी किशोर केदारी यांनी ‘समता’ नामक कविता सादर करून श्रोत्यांची वाहवा मिळवली. यामध्ये ते म्हणतात, साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे काय वर्णावी तुमची महती, चंद्र, सूर्य, हिरे, मोती, सर्वांचेच तेज तुमच्या पुढे फिके हो पडती! तुमच्या पुढे फिके हो पडती…, कवी अनिल दीक्षित यांनी ‘नोटा बंदी’, तुकाराम पाटील यांनी ‘स्वातंत्र्याचा अर्थ खरा’ ही गजल तर पितांबर लोहार यांनी विडंबन सादर केले.
कवितेतून मांडले परखड विचार
कवी सुनील भिसे यांनी ‘अधोगती’ तर दीपेश सुराणा यांनी ‘माय बोली’ ही कविता सादर करून संमेलनात रंगत आणली. कवयित्री मधुश्री ओव्हाळ यांनी ‘जीवन गाणे’, प्रभाकर वाघोले यांनी ‘माळीनगाव’, संदीप साकोरे यांनी ‘अधोगती’, राजेंद्र घावटे यांनी ‘भारत एक व्हावा’, शिवाजी साळवे यांनी ‘दर पार्टीला प्रत्येक वेळी एक क्वार्टर कमी पडते’ ही कविता सादर केली. कवी धनंजय भिसे यांनी ‘हेच कळत नाय’ ही कविता सादर केली. त्यामध्ये ते म्हणतात, मातीला सोन्याचा भाव देणार्याचं महत्त्व वाढतय काय, का मातीतून सोने उगवणार्यांची कत्तले होते काय, हेच कळत नाय’, कवी सुहास घुमरे यांनी आपल्या ‘वेठबिगार’ या कवितेतून परखड विचार मांडले. सूत्रसंचालन कवी किशोर केदारी यांनी केले.