नवी दिल्ली । ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहून लोकायुक्तांची नियुक्ती करण्यासह स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्याची मागणी केली आहे. याकडे दुर्लक्ष झाल्यास दिल्लीत उपोषणाला बसण्याचा इशारादेखील त्यांनी या पत्रातून दिला आहे. मोदी सरकार सत्तेत येऊन तीन वर्षे झाली तरी या सरकारने अद्याप लोकपाल आणि लोकायुक्त नियुक्त केलेले नाहीत.
मोदी सरकार अपयशी
अण्णा हजारे यांनी आपल्या पत्रातून सरकारवर टीका केली आहे.गेल्या सहा वर्षांपासून भारताला भ्रष्टाचारामुक्त करण्यासाठी आपली चळवळ सुरु आहे. मात्र, याची या सहा वर्षांच्या काळात यापूर्वीच्या आणि सध्याच्या सरकारनेही दखल घेतलेली नाही. अद्याप सरकारकडून भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी निश्चित असा कायदा करण्यात आलेला नाही. तसेच लोकपाल आणि लोकायुक्तांच्या नियुक्तीकडेही दुर्लक्ष केल्याचा त्यांचा आरोप आहे.
कठोर कायदे हवेत
हजारे यांनी सरकारच्या जाहिरातबाजीवर टीकास्त्र सोडले जाहिरातबाजीने प्रश्न सुटणार नाही. केवळ पोस्टरबाजी करून महिला सुरक्षित होत नाहीत की भ्रष्टाचार थांबत नाही. त्यासाठी कठोर कायदे करून त्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करत सरकारला उद्योगपतींचीच काळजी असल्याची टीका त्यांनी केली.