अतिक्रमणग्रस्तांना पर्यायी जागा देण्यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

0

भुसावळच्या माजी उपनगराध्यक्षांसह महिलांनी दिले निवेदन ; पर्यायी जागेबाबत आश्‍वासन

भुसावळ- शहरातील पंधरा बंगला भागात रेल्वे हद्दीतील अतिक्रमणग्रस्तांना पर्यायी जागा मिळावी यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच त्याबाबतची कार्यवाही सुरू होणार आहे. पर्यायी जागेसाठी माजी उपनगराध्यक्ष मोहन निकम यांच्यासह महिलांनी जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांना लोकशाही दिनी निवेदन दिले. त्यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी आश्‍वासित केले. यावेळी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी अनिता खरारे, एम.आर.तायडे, जी.पी.सोनवणे, रवींद्र निकम, लीना तव्हारे, विनोद निकम, शेख बाबूलाल शेख बशीर, आनंद नरवाडे आदी उपस्थित होते.

पालिकेच्या खुल्या भूखंडावर पुनर्वसनाची मागणी
निवेदनानुसार, शहरातील दक्षिण व उत्तर भागातील सुमारे पाच हजार झोपड्या 15, 16 व 17 ऑक्टोबरला रेल्वेने अतिक्रमणात काढल्याने अनेक लोक बेघर झाले. प्रशासनातर्फे उत्तर भागातील झोपडपट्टीधारकांना सर्वे क्रमांक 63/1 ही जागा पुनर्वसनासाठी निश्‍चित केली. परंतु ही जागा आठ किलोमीटर लांब असून ये-जा करण्यासाठी खर्च परवडणारा नाही म्हणून पंधरा बंगला भागातील (दक्षिण भाग) रहिवाशांना गैरसोयीची आहे. त्यांच्या मुलांची शाळा, पुरुषांसाठी रोजगाराचे साधन पंधरा बंगला भागातच आहे त्यामुळे पंधरा बंगला भागातील अतिक्रमणग्रस्तांनी 26 नोव्हेंबरपासून तीन दिवस प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले. उपोषण सोडताना जिल्हाधिकार्‍यांकडे प्रस्ताव सादर करून कार्यवाही व्हावी, अशी प्रांताधिकार्‍यांना विनंती केली होती. त्यानुसार पंधरा बंगला भागातील रहिवाशांना सर्वे क्रमांक 181, 182, 191, 192 या पालिकेच्या खुल्या भूखंडावर पुनर्वसन करावे अशी मागणी केली आहे.