रेल्वे प्रशासन मांडणार बाजू ; गोरगरीबांसाठी माजी आमदार चौधरींची पडद्यामागून भूमिका
भुसावळ– शहरातील रेल्वे हद्दीतील अतिक्रमणप्रश्नी आगवाली चाळ भागातील रहिवासी छोटेलाल हरणे यांनी भुसावळ न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी सोमवारी, 22 रोजी होणार असून यावेळी रेल्वे प्रशासन आपली बाजू व भूमिका मांडणार आहे. यामुळे 22 नंतरच अतिक्रमणप्रश्नी अंतीम निर्णय होणार आहे. तो पर्यंत कारवाई लांबली आहे.
न्यायालयाच्या निर्णयाकडे लागले लक्ष
रेल्वे विभागाने आगवाली चाळ व अतिक्रमित भागात 19 जानेवारीनंतर कारवाई करण्याचे संकेत दिले होते मात्र या प्रकरणी आगवाली चाळ भागातील रहिवासी छोटेलाल हरणे यांनी भुसावळच्या अतिरीक्त सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. हरणे यांनी 19 डिसेंबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर 27 डिसेंबर रोजी सुनावणी होऊन न्यायालयाने पुढील न्यायासाठी सात दिवसांच्या आत दिवाणी न्यायालय, भुसावळ यांच्याकडे न्याय मागावा, असे
निर्देश दिले होते. या आदेशानुसार या काळात रेल्वेने कारवाई केली नाही. हरणे यांनी औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार भुसावळ न्यायालयात 14 जानेवारी रोजी अपिल केले असून या प्रकरणावर आता सोमवारी पुढील सुनावणी होणार आहे. रेल्वे प्रशासन आपली भूमिका मांडणार आहे.
माजी आमदार संतोष चौधरींचे सहकार्य -छोटेलाल हरणे
झोपडपट्टी उठू नये यासाठी हरणे यांचा न्यायालयीन लढा सुरू असलातरी पडद्याआडून मात्र मात्र आमदार संतोष चौधरी त्यासाठी सहकार्य करीत असल्याचे बोलले जात आहे. चौधरी यांनी अत्यंत गोपनीय पद्धत्तीने गोरगरीबांना हक्काचे छत मिळण्यासाठी न्यायालयीन लढा सुरू ठेवला आहे. माजी आमदार चौधरींसह नगरसेवक उल्हास पगारे यांचे सहकार्य लाभत असल्याचे हरणे म्हणाले.