बारामती । अतिक्रमणविरोधी कारवाई करताना बारामती नगरपालिकेने छोटे आणि मोठ्या व्यवसायिकांमध्ये भेदभाव केल्याची चर्चा सध्या शहरात रंगत आहे. मोठ्यांना अभय देत छोट्या व्यवसायांवर कारवाईचा बडगा उगारल्याचे बोलले जात आहे. मागील अनेक वर्षापासून प्रशासन फक्त भिगवण रस्त्यावरच कारवाई करताना दिसते. मात्र, याच रस्त्यावरील सूर्यनगरी चौकातील सर्व्हिस रोडमध्ये आडवे आलेले सहा गाळे (दुकाने) का वाचविले जातात, त्याचप्रमाणे अजित पवार ज्या सहयोग सोसायटीमध्ये राहतात त्याच सोसायटीच्यासमोर अनधिकृत अशी भव्य इमारत उभी राहते. याकडे प्रशासन का दुर्लक्ष करते, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. अतिक्रमणविरोधी कारवाई ही नुसती देखाव्या पुरतीच असल्याचे दिसून येत आहे.
अतिक्रमणविरोधी कारवाई
गेल्या दोन दिवसांपासून नगरपालिकेने अतिक्रमणविरोधी कारवाई मोहीम उघडली आहे. गुरुवारच्या कारवाईत 200 च्यावर अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली होती. वृत्तपत्र विक्रेत्यांचे स्टॉलही जप्त करण्यात आले होते. या अतिक्रमण कारवाईत प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसिलदार हनुमंत पाटील, मुख्याधिकारी मंगेश चितळे, पोलिस निरिक्षक विजय जाधव, नगरपालिकेचे बांधकाम अभियंता जिवन केंजळे, बारामती ग्रामीणचे पोलिस निरिक्षक सुरेशसिंह गौड, नगरपालिकेचे रत्नरंजन गायकवाड, आर.पी. शहा, पाणीपुरवठ्याचे विजय सुर्यवंशी, अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुनिल धुमाळ, आरोग्य अधिकारी सुभाष नारखेडे, राजेंद्र सोनवणे, अजय लालबिगे तसेच अतिक्रमण विभाग आणि आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांनी सहभाग घेतला.
कुठेही विका भाजी
बारामतीच्या सिनेमा रोड, गुणवडी चौक, इंदापूर चौक, नवीन गुणवडी चौक, एस.टी.स्टॅन्डचा परिसरातील पार्किंगच्या जागा हातगाडीवाल्यांनी बळकावल्या आहेत. या भागात तुम्ही कोठेही भाजीपाला विकू शकता. रस्त्यावर चप्पल विक्रीची दुकाने मांडू शकता, शहाळे विक्रीची गाडी लावू शकता. एवढेच नव्हे तर कपडेही तुम्ही रस्त्यावर विकू शकता. भर रस्त्यामध्ये गाडी लावून केळी, मटार असे काहीही विकू शकता. तुम्हाला अतिक्रमण विभाग काहीही धक्का लावू शकत नाही. अशा परीस्थितीत गाडी कुठे पार्क करायची हे वाहन चालकाने ठरावयचे, असे चित्र बारामती शहरात दिसते. तसेच धनाढ्य व्यापार्यांनी पार्किंगच्या जागेत एक गोडावून उभा केले आहे. हे सारे चित्र स्पष्टपणे दिसत असूनदेखील अतिक्रमण विभाग काहीही हालचाल करत नाही याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
कारवाई केवळ नावालाच
दुसर्या दिवशीची अतिक्रमणविरोधी कारवाई ही केवळ नावापुरतीच असावी, असे कारवाई वरून दिसून आले. पालिकेचे कर्मचारी छोट्या छोट्या दुकानदारांचे फलक काढण्यात दंग होते. मात्र त्यांना मोठ्या दुकानादारांची अतिक्रमणे दिसतच नव्हती, अशी परिस्थिती होती. बारामतीच्या नगरपालिका प्रशासनाला फक्त पंचायत समिती ते पेन्सिल चौक हा भिगवण रस्ताच स्वच्छ असावा, असे वाटते. याच भागातील रंगरंगोटी आवडते. याच भागातील झाडांचे संगोपन केले जाते. हे रहस्य बारामतीकरांना अजून उलगडले नाही.
हॉकर्स झोन उभारण्यास टाळाटाळ
कारवाई करण्यापूर्वी स्टॉलधारकांना आगाऊ सूचना देण्याचे कष्टही नगरपालिकेने उचलले नाही. त्यामुळे किमान स्टॉलधारकांचे नुकसान टळले असते. बारामती शहरात हॉकर्स झोनचा प्रश्न हा अतिशय गंभीर स्वरुपाचा आहे. निश्चित स्वरूपात हॉकर्स झोन सुरू करावेत, अशी सातत्याने मागणी होत आहे. राज्यसरकारनेही तसे आदेश दिलेले असताना नगरपालिका टाळाटाळ करते, अशी नागरिकांची तक्रार आहे.