पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिका आणि पिंपरी चिंचवड नवनगर प्राधिकरणच्या प्रशासनाने आज आपपल्या हद्दीत अतिक्रमणे हटविण्याची कारवाई केली. दोन्ही ठिकाणी वेगवेगळ्या कारणांनी ही कारवाई विवादास्पद ठरली. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने रावेत येथे करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान भिंत अंगावर कोसळल्याने ज्येष्ठ नागरिक जखमी झाले. दुसरीकडे प्राधिकरण प्रशासनाच्या वतीने थेरगाव येथे करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान गैरसमजामुळे घर बचाव संघर्ष समितीचे सदस्य त्या ठिकाणी पोहचल्याने मोठा तणाव निर्माण झाला आणि सरकारी कामात अडथळा आणण्याचा आरोप करत पोलिसांनी काही लोकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न ही केला.
मिळालेल्या माहितीनुसार प्राधिकरण प्रशासनाने थेरगाव येथे, धनगरबाबा चौकाजवळील नवीन बांधकाम असलेल्या एका इमारतीवर कारवाई केली, परंतु नागरिकांना याबाबत काही माहिती नसल्यामुळे संभ्रम निर्माण झाला. रिंगरोड प्रकल्पामुळे गेल्या दीड महिन्यांपासून भयभीत असलेल्या नागरिकांनी कारवाईच्या ठिकाणी धाव घेतली. नागरिकांना याची माहिती नव्हती की कारवाई नवीन अनधिकृत बांधकामावर होत आहे यामुळे नागरिक आणि अधिकार्यांच्यामध्ये विवाद सुरू झाला. घर बचाव संघर्ष समितीच्या सदस्यांना यावेळी वाकड पोलिसांनी ताब्यातही घेतले. यानंतर येथे अजूनच तणाव निर्माण झाला समिती कार्यकर्त्यांना वाकड पोलीस ठाणे पोलीसांनी ताब्यात घेतल्यामुळे काही काळ तेथे तणाव निर्माण झाला. रहिवासी इमारतीवर कारवाई नसल्याचे काही वेळातच स्पष्ट झाले आणि परिस्थिती निवळली.
घर बचाव संघर्ष समितीची स्पष्ट भूमिका अशी आहे की, 21 जुलै 2017 रोजी महाराष्ट्र शासनाने अनधिकृत घरांना नियमित करण्यासाठीचा अद्यादेश काढलेला आहे, त्याच्या अनुषंगाने जोपर्यंत सदरची सर्व रहिवाशी घरे नियमितीकरणाची प्रक्रिया पूर्ण होत नाही. तोपर्यंत कोणत्याही प्रकारची कार्यवाही प्रशासनाने करू नये. तसेच आमच्या समिती कार्यकर्ते ,सदस्य, पदाधिकारी, रहिवाशी यांचेवर कोणत्याही प्रकारची कायदेशीर कार्यवाही करू नये. दुसरीकडे प्राधिकरणाच्या अधिकार्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार थेरगाव येथील सर्व्हे नं. 5 मध्ये नव्याने होत असलेल्या 1800 चौरस फूट क्षेत्राच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली आहे. या दरम्यान चुकीची माहिती मिळाल्याने काही नागरिक तेथे आले होते. त्यांना ही कारवाई उच्चक्षमता द्रुतगती मार्गासाठी होत असल्याचा गैरसमज होता. त्यामुळे थोडासा विवाद झाला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी काही सदस्यांना ताब्यात घेतले होते. प्राधिकरणाच्या वतीने कोणतीही तक्रार करण्यात आली नाही.