धुळे । शहरातील अतिक्रमणाचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे. यात अजून एक भर पडली आहे ती भाजीपाला व फळविक्रेत्याची. शहरातील प्रमुख रस्त्यावर या विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. रस्त्याचे कडेला मिळेल त्या जागेवर भाजीपाला विक्रेता पथारी टाकून ठाण मांडून बसून राहतात. त्यातच खरेदी करणार्या महिला व पुरूष आपली वाहने रस्त्यावरच अस्तावस्त उभी करून खरेदी करतात. परिणामी वाहतुकीची कोंडी होते. वाहतुकीच्या कोंडीमुळे मोेटारसायकल चालवणे देखील अवघड होते. अशा प्रकारे रस्त्यावर अतिक्रमण करणार्या विक्रेत्यांवर मनपा प्रशासन व वाहतूक पोलिस दुर्लक्ष करताना दिसून येते. यामुळे विक्रेत्यांना चांगलेच फावते. परिणामी दिवसेंदिवस भाजीपाला व फळ विक्रेतेची संख्या वाढताना दिसून येत आहे. अशा वाहतुकीला अडथळा निर्माण करणार्या विक्रेत्यांवर कारवाइृ करणे गरजेच्या आहे, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
मनपा कधी करणार कारवाई ?
गेल्या अनेक महिन्यांपासून भाजीपाला व फळ विक्रेते रस्त्यावरच आपला अतिक्रमण करून आपला व्यवसाय थाटतात आहे. यावर कारवाई करण्याच्या आवश्यकता असतांना वाहतूक पोलिस मात्र बघ्याची भूमिका घेतात. मनपाचे अतिक्रमण विभागालाही या व्यावसायीकाच्या अतिक्रमण दिसू नये याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शहरात कुठेही अतिक्रमण होऊ न देणे ही मनपा प्रशासनाची जबाबदारी असताना याकडे मात्र मनपाचे अतिक्रण विभाग दुर्लक्ष करताना दिसून येते.
साक्री बसस्थानक परिसरात वाहतुकीची कोंडी
साक्री । साक्री शहरातील बसस्थानक परिसरात वाहतुकीची कोंडी होत असून येथे नेहमीच ट्रॅफिक जॅमने नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरात प्रवेश करण्यासाठी हा मुख्य रस्ता असून या रस्त्यावरच बसस्थानक आहे. यानिमित्ताने येथे वर्दळ चालूच असते. शहराचा रस्तेकडील दोन्ही बाजूस व्यावसायिकांची दुकाने, हॉटेल असल्याने त्यांच्या दुकानांसमोर अवास्तव लावलेल्या मोटरसायकलींचा त्रास नेहमीच बसचालकांना होत असतो. दूध व्यावसायिकांनी आपली दुकानेच रस्त्यावर थाटली आहेत. आपली चार चाकी वाहने रस्त्यावर उभी करायची व आपले दूध विक्री होईपर्यंत तेथेच थांबायचे. आपले कोण काय करून घेईल ? अशी भूमिका घेवून आपली मनमानी करणारे रस्त्यावरून ये-जा करणार्यांची थोडीही दूध व्यावसायिकांना चिंता नसते. काही वेळा ट्रॅफिक लवकर मोकळी झाली नाही तर दूध व्यावसायिक व पादचारी यांच्यात वादही होतात. याचा मात्र त्यांच्यावर फारसा फरक पडत नाही. नुकत्याचे दोन दिवसांपूर्वी एका कार चालकाचा कार वरील ताबा सुटल्याने कार सुसाट वेगाने सुटत रस्त्यावरील मोटरसायकली, सोडा सेंटरचे दुकानांना चेंगरत एका दुकानाच्या ओट्यावर जावून धडकली. या घटनेत काही लोक जखमीही झाले. सुदैवाने जिवितहानी मात्र टळली. अशा काही घटनांमधून धडा घेण्याचे काम जर प्रशासनाने केले तर बरच होईल. ट्राफिक जॅमचा प्रश्न कधी सुटेल याची वाट नागरीक पाहत आहेत.
रस्त्यावर विक्रेत्यांचे अतिक्रमण
भाजीपाला व फळे विक्रेत्यांनी शहरातील बसस्थानक, साक्री रोडवरील जुने जिलहा रूग्णालयसमोर, विद्यावर्धिनी कॉलेज, आग्रारोड, नकाणे रोड,वाडीभोकर, अतिक्रमण करून आपली दुकाने थाटतात. दुपारी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत विक्रेते या ठिकाणी व्यवसाय करीत असल्यामुळे या रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. वाहनधारकांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागते. बरेच वेळाला विक्रेते व वाहनधारक यांच्यामध्ये यामुळे वाद निर्माण होत असतो.