अतिक्रमणांवर पालिकेचा हातोडा

0

एरंडोल । येथील नवीन बसस्थानक परिसरात राष्ट्रीय महामार्गालगत असलेले अतिक्रमण पालिकेने काढल्यामुळे या परिसराने मोकळा श्वास घेतला आहे. अतिक्रमण काढल्यामुळे सुमारे 34 व्यावसायिकांसमोर उपासमारीचे संकट उभे राहिले आहे. यात 34 बेरोजगारांना प्रत्यक्ष तर शेकडो युवकांना अप्रत्यक्षपणे रोजगाराला मुकावे लागले आहे. अतिक्रमण धारकांना पालिकेने पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी युवकांनी केली आहे. राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण होणार असल्यामुळे सदरचे अतिक्रमण त्यावेळी काढावेच लागणार होते, मात्र त्यापूर्वीच पालिकेने अतिक्रमण काढून टाकले आहे. आगामी काळात या परिसरात पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची दक्षता पालिकेने घ्यावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

अतिक्रमण काढतांना व्यावसायिकांच्या डोळ्यात अश्रू
राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या नविन बसस्थानक परिसरात अनेक बेरोजगार तरुणांनी चहादुकान, पानदुकान, फळविक्री, शेंगदाणे विक्रीचे व्यवसाय सुरु केले होते. रहदारीस अडचण येत असल्यामुळे पालिकेने सर्व अतिक्रमणधारकांना नोटीसा देवून अतिक्रमण काढून घेण्याचे कळविले होते. 6 जून रोजी काही व्यवसायधारकांनी स्वता:हून अतिक्रमण काढून घेतले तर आज सकाळी पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकातील कर्मचार्‍यांच्या उपस्थितीत पोलीस बंदोबस्तात राहिलेले अतिक्रमण काढण्यात आल्यामुळे या परिसराने मोकळा श्वास घेतला आहे.

राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण होणार असल्यामुळे अतिक्रमण त्यावेळी काढावेच लागणार होते, मात्र त्यापूर्वीच पालिकेने अतिक्रमण काढून टाकले आहे. दरम्यान अतिक्रमण काढल्यामुळे अनेक युवक बेकार झाले असून पालिकेने सर्व अतिक्रमण धारकांना पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी अतिक्रमणधारकांनी केली आहे. अतिक्रमण काढत असतांना नागरिकांनी परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. पालिकेच्या मुख्याधिकारी विशाखा मोटघरे यांचे मार्गदर्शनाखाली बबलू परदेशी, दिनेश बडगुजर, व्ही.टी.साळी, दीपक गोसावी, किशोर पाटील, अशोक महाजन यांचेसह पालिकेच्या सुमारे पन्नास कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले. पोलीस निरीक्षक बाळासाहेब केदारे, उपनिरीक्षक एम.एस.बैसाणे यांनी पोलीस बदोबस्त ठेवला होता.