जळगाव । अतिक्रमणची कारवाई करतांना भेदभाव केला जात असल्याचा आरोप महापौर ललित कोल्हे यांनी केला. ते त्यांच्या दालनात अतिक्रमण विभागाच्या घेतलेल्या बैठकीत बोलत होते. यावेळी उपायुक्त लक्ष्मीकांत कहार, अतिक्रमण अधिक्षक एच.एम. खान व अतिक्रमण निर्मुलन विभागाचे कर्मचारी व मक्तेदाराचे कर्मचारी उपस्थित होते. महाबळ परिसरात अतिक्रमण कारवाईत जप्त करण्यात आलेले सामान चोरीस गेले असल्याचा गंभीर आरोप महापौर कोल्हे यांनी केला. तसेच बालगंधर्व थेटअरमध्ये जप्त केलेले सामान चोरी झाल्यास त्याला जबाबदार कोण ? अशी विचारणा महापौर कोल्हे यांनी केली. यावर उपायुक्त कहार यांनी वॉचमन जबाबदार असेल असे स्पष्ट केले.
महिला विक्रेत्यांनी मांडली कैफीयत
दरम्यान, आज, घाणेकर चौक येथील आंबे विक्रेत्या महिलांनी अतिक्रमण निर्मुलन पथकातील मक्तेदाराच्या कर्मचार्यांना मारहाण केली असल्याचे महापौर कोल्हे यांना कर्मचार्यांनी सांगितले. त्याचवेळी आंबा विक्रेत्या महिला आशाबाई व गोदावरीबाई हे देखील महापौर कोल्हे यांच्याकडे आपली कैफीयत घेूवन आल्या. या महिलांनी अतिक्रमण निर्मुलन पथकाव्दारे लोटगाड्यांवर कारवाई न करता त्यांच्यावर कारवाई करण्यात येत असल्याची तक्रार महापौरांकडे करण्यात आली. महापालिकेची रितसर पावती फाडत असतांना त्यांच्यावर अन्यायकारक कारवाई करण्यात असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केला.
टाइम झोन आखण्याच्या सूचना
अतिक्रमण अधिक्षक खान यांनी या आंबे विक्रेत्या महिलांसदर्भांत तक्रार आल्याने कारवाई केली असल्याचे महापौर कोल्हे यांच्या निदर्शनाश आणून दिले. शहरातील हॉकर्स व कर्मचार्यांमधील वाढता वाद बघता टाइम झोन आखून देण्याची सूचना महापौरांनी अधिकार्यांना केली. तसेच शहरातील विविध मार्केटमध्ये हेतुत: विविध प्रकारचे साहित्य ठेवून वा विक्री योग्य वस्तू ठेवून जागा व्यापणार्या बेजबाबदार हॉकसे तसेच दुकानदारांविरोधात कार्यवाहीसाठी अतिक्रमण निर्मुलन पथकाने अचानक जावून कारवाई करावी असे आदेश त्यांनी संबंधित अधिकार्यांना दिले.