अतिक्रमणातील 27 घरे जमिनदोस्त

0

शिरपूर । शहरातील उपजिल्हा रुग्णालयाच्या भिंतीला लागून असलेले अतिक्रमण न्यायालयाच्या आदेशाने नगरपालिकेने शनिवारी काढले. या वेळी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून हे अतिक्रमण होते. येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या भिंतीला लागून काही जणांनी निवासी अतिक्रमण केले होते. नगरपालिकेच्या कारवाईत 27 घरे पाडण्यात आली. याठिकाणी गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून राहत होते. हा भाग आदर्शनगर म्हणून ओळखला जातो. या भागातील कमलकिशोर भंडारी, नंदकिशोर राठी यांच्यासह तीन ते चार जणांनी अतिक्रमण हटवण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने नगरपालिकेला अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले होते. याचिकाकर्त्याच्या घराचे कपाऊंड पायर्‍या अतिक्रमणात येत असल्याने त्याही हटवण्यात आल्या.

पोलिस बंदोबस्त काढले अतिक्रमण
उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावित पोलिस निरीक्षक संजय सानप यांच्यासह पन्नास पोलिस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते. हे अतिक्रमण नोव्हेंबरलाच काढण्यात येत होते. तेव्हापासून अतिक्रमणधारकांनी पर्यायी जागेसाठी नगरपालिकेत बिर्‍हाड आंदोलन सुरू केले आहे. दिवसभर अतिक्रमणधारक नगरपालिकेच्या आवारात ठाण मांडून बसत आहेत. तेथेच स्वयंपाकही करत आहेत. अतिक्रमणधारकांना कळमसरे गावाच्या शिवारात अतिक्रमणधारकांना जागा देण्याचे आश्‍वासन देण्यात आले. मात्र, त्यांनी शहरातच जागा देण्याची मागणी करीत कळंमसरे येथील जागेवर जाण्यास नकार दिला आहे. त्यामुळे तिढा कायम आहे.