बारामती । बारामती शहरातील सर्व रस्ते विशेषत: तीन हत्तीचौक ते पेन्सिल चौक या साडेचार किलोमीटरच्या अंतरात फेरीवाले, दुकानदार आदींनी मोठ्या प्रमाणार अतिक्रमण केले होते. या अतिक्रमणावर बारामती नगरपालिकेने गुरुवारी कारवाईचा बडगा उगारला होता.
बारामती नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश चितळे व प्रांताधिकारी हेमंत निकम यांनी अतिक्रमण विभागाची दोन गटात विभागणी करून अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पाच तासात 200 च्यावर अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. दुसर्या टप्प्याच्या मोहिमेत बारामतीतील एसटी स्टँड परिसर, सिनेमा रोड, गुनवडी चौक, इंदापूर चौक, कसबा, मार्केट यार्ड, नवा गुनवडी चौक या भागातील अतिक्रमणे काढण्यात येतील, असे निकम व चितळे यांनी दै. जनशक्तिशी बोलताना सांगितले. अनधिकृत फलक, टपर्या, व कायमस्वरूपी उभारण्यात आलेली कामे जमीनदोस्त करण्यात आले.
नऊ वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्याधिकारी किरणराज यादव यांनी अतिक्रमण मोहिम तीव्र स्वरुपात राबवून शहरातील चौक व रस्ते मोकळे केले होते. मात्र पुन्हा गेल्या 9 वर्षात एकदाही बारामती नगरपालिकेने अतिक्रमण मोहिम राबविली नाही. याबद्दल नागरिकांत आश्चर्य व्यक्त केले जात होते.
वृत्तपत्र विक्रेत्यांचे स्टॉल जप्त
पेन्सिल चौक व सूर्यनगरी चौक येथील वृत्तपत्र विक्रेत्यांचे स्टॉलही जप्त करण्यात आले आहेत. ही आमच्यावर अन्यायकारक कारवाई आहे, असे म्हणत बारामती वृत्तपत्र विक्रेता संघाने शुक्रवार वृत्तपत्रे वितरीत केली नाहीत.