भुसावळ । शहरातील सत्ताधारी भाजप गटाच्या नगरसेवकाने म्युनिसिपल संकुलाचे टेरेस, तार ऑफिस रोडवरील पंचवटी गौरव हॉटेलजवळ आणि नाहाटा जलकुंभाच्या शेजारी वॉलमनच्या रुमला लागूनच अतिक्रमण केले आहे. या नगरसेवकावर तत्काळ कारवाई करुन त्यास अपात्र करावे, अशी मागणी जनआधार विकास पार्टीने जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली. भाजपा नगरसेवकाने पालिकेच्या जागेवर अतिक्रमण करण्याचा सपाटा सुरु केला आहे. विना परवानगीने पदाचा गैरवापर करुन सर्रास अतिक्रमण करुन बांधकाम केले जात आहे.
व्यापारी संकुलाच्या गच्चीवर पत्र्यांचे शेड
सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असल्यावरही अतिक्रमण हटवले जात नाही. विनापरवानगी अतिक्रमण सुरु असतांनाही सत्ताधारी नगरसेवकाला मुख्याधिकारी बी.टी. बाविस्कर पाठीशी घालत असल्याचा आरोप जनाधारतर्फे करण्यात आला आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेतील नगरपालिकेच्या व्यापारी संकुलाच्या गच्चीवर सरसकट पत्र्यांचे शेड टाकण्यात आले. यासह तार ऑफिस रोडवरील व्यापारी संकुल व मोकळ्या जागेतही पत्र्यांचे शेड टाकले गेले आहे. नाहाटा महाविद्यालयाच्या शेजारी असलेल्या जलकुंभाजवळ व्हॉल्वमन रुमला लागून असलेल्या जागेला तारेचे कम्पाऊंड करुन जागेवर कब्जा मिळवला गेला आहे. या सर्व प्रकरणांची तक्रार केल्यानंतरही कारवाई होत नाही. यामुळे जिल्हाधिकार्यांनी चौकशी करुन संबंधित नगरसेवकाला अपात्र करावे, अशी मागणी तक्रार अर्जाद्वारे करण्यात आली आहे.