अतिक्रमण काढण्यासाठी मुख्यमंत्र्याचे आदेश – आ.गोटे

0

धुळे । शहरातील अतिक्रमण काढण्यासाठी कित्येक वर्षापासून शासनाकडे तगादा लावल्यामुळे व वेळोवेळी पाठपुरावा केल्यामुळे अखेर धुळ्यातील अतिक्रमणे काढण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी तसे आदेश दिले आहेत. 31 मे पूर्वी धुळ्यातील रस्ते मोकळे होतील. शहरातील 122 रस्ते अतिक्रमणमुक्त करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली हायपॉवर समिती देखील स्थापन करण्यात आली आहे. या समितीत जिल्हाधिकारी,पोलीस अधिक्षक, आयुक्त, कार्यकारी अभियंता,उपायुक्त या अधिकार्‍यांची समिती गठीत करण्यात आली आहे. अशी माहिती धुळ्याचे आमदार अनिल गोटे यांनी दिली आहे.

वाहतुकीची कोंडी बनलीय नेहमीची समस्या
आमदार गोटे यांनी म्हटले आहे की, धुळ्यातील वाहतुकीला अडथळे ठरणारे अतिक्रमणे काढून सर्वसामान्यांच्या वापरासाठी रस्ते मोकळे क रावेत, अशी मागणी मी सातत्याने करीत आहे. शहरातील बहुतेक रस्ते 50 वर्षा पूर्वीचे आहेत. गेल्या 25 वर्षांत वाहनांची संख्या 30 ते 40 पटीने वाढली आहेत. धुळ्यात शैक्षणिक संस्थांचे जाळे वाढले आहेत. त्या तुलनेने रस्ते मात्र आहे तेवढ्या रुंदीचे आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी ही धुळेकरांसाठी नेहमीची समस्या होऊन बसली आहे. वाहनांच्या गर्दीला वाट मोकळी करुन देण्यासाठी, त्यावर उपाय शोधून त्याची अंमलबजावणी करण्याची जवाबदारी महापालिका प्रशासन व पोलिस यंत्रणेची आहे. मात्र, या दोन्ही संस्था कुचकामी ठरल्या आहेत. शहरात वाटेल तेथे वाहने उभी केली जातात. रस्त्याच्या मध्यभागापर्यंत दुकान व बँकांपुढील आडवे-उभे लावलेल्या वाहनांची गर्दी होते. रस्त्याने पायी चालणेही कठीण झाले आहे. अतिक्रमणाबद्दल माहिती कळवा, असे आवाहन आपण करताच धुळेकरांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरातील लहान मोठे 122 रस्ते अतिक्रमणे बाधीत आहेत. पालिका प्रशासनाला वारंवार कळवूनसुद्धा उपयोग होत नाही. त्यामुळे अतिक्रमणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी जनतेच्या आलेल्या तक्रारी आपण थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडल्या. पाच वरिष्ठ अधिकार्‍यांची विशेष समिती नेमून अतिक्रमणांची शहनिशा करुन रस्ते मोकळे करा, अशी मागणी आमदार गोटे यांनी मुख्यमंत्र्याकडे केली असता त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत हायपॉवर समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.