पुणे । महापालिकेकडून अतिक्रमण कारवाईत प्रमुख रस्त्यांवरून जप्त करण्यात आलेली वाहने संबंधित वाहन मालकांनी एका महिन्याच्या आत दंड भरून घेऊन न गेल्यास त्यांचा लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या अतिक्रमण विभागांचे प्रमुख माधव जगताप यांनी दिली.
या गाड्या रस्त्यावरून उचलण्यापूर्वी त्यावर नोटीसा लावण्यात आल्या होत्या. तसेच, मुख्यसभेच्या ठरावानुसार, वाहने जप्त केल्यानंतर ती सोडवून नेण्यासाठी 10 हजार रुपयांचा दंड असून वाहन जप्त केल्यानंतर एका महिन्याच्या आत ते घेऊन जाणे आवश्यक असल्याचे जगताप यांनी स्पष्ट केले. गेल्या काही दिवसांत अतिक्रमण विभागाने 376 वाहने महापालिकेकडून जप्त करण्यात आली आहेत. ही वाहने ठेवण्यासाठी प्रशासनाने पाच गोडाऊन केलेली असून या वाहनांनी ती भरलेली आहेत.
महापालिकेकडून शहरातील अतिक्रमण कारवाई तीव्र करण्यात आली आहे. त्या अंतर्गत शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी तसेच रस्ते रिकामे करण्यासाठी वर्षानुवर्षे रस्त्यावरून धूळखात पडून असलेली वाहने महापालिकेकडून जप्त करण्यात येत आहेत. 206 दुचाकी, 141 चारचाकी, 27 तीन चाकी तर, 3 सहाचाकी वाहने जप्त केली आहेत. ही वाहने जप्त करण्यापूर्वी प्रशासनाकडून त्यावर नोटीसा चिटकविण्यात आल्या होत्या. तसेच, ही वाहने काढून घेण्यासाठी नागरिकांना मुदत देण्यात आली होती. त्यानंतरही ही वाहने नागरिकांनी काढून न घेतल्याने आता प्रशासनाने ती जप्त केली आहेत. मात्र, ती सांभळणेही जीकरीचे असल्याने एका महिन्याच्या आत संबंधित वाहनमालकाने शुल्क भरून घेऊन न गेल्यास त्यांचा लिलाव केला जाणार आहे. त्यासाठी आरटीओची मदत घेण्यात येणार आहे.