अतिक्रमण कारवाईने सुभाष चौकाने घेतला मोकळा श्वास

0

हॉकर्सचे ३५ साहित्य जप्त;कारवाईच्या वेळी वाद

जळगाव: महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागातर्फे मंगळवारपासून पून्हा कारवाईची मोहीम राबविण्यात आली आहे. उपायुक्त अजित मुठे यांच्या उपस्थितीत मोहिम राबवली. यावेळी 35 हातगाड्यासह बाकडे, पेट्या व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. या कारवाईमुळे सुभाष चौक परिसरातील रस्त्यांसह नागरिकांनी मोकळा श्वास घेतल्याचे दिसून आले.

शहरातील सुभाष चौक, फुले मार्केट परिसरात मोठ्याप्रमाणात फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे या भागातून ये-जा करतांना प्रत्येकाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. अतिक्रमणामुळे महिलांच्या सोनसाखळी चोरीचे देखील प्रकार या भागात वारंवार होत असून पार्किंगची जागा फेरीवाल्यांनी बळकाविल्या आहे. त्यामुळे महानगरपालिकेचे उपायुक्त अजित मुठे यांनी शहरातील अतिक्रमणाविरुध्द मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमे अंतर्गत मंगळवारी शहरातील सुभाष चौक, बळिराम पेठ, बेंडाळे चौक, तिजोरी गल्ली, बोहरा गल्ली, अशोक किराणा परिसर, शिवाजी रोड आदी भागातील 35 हातगाड्या, बाकडे, पेट्यासह ईतर साहित्य महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकांने जप्त केले. तसेच दुकानांबाहेर असलेले फलक देखील जप्त करण्यात आले आहेत. यावेळी सुरुवातीला काही हॉकर्सधारकांनी कर्मचार्‍यांशी वाद घातला.