अतिक्रमण पथकास पथारी व्यावसायिकांची धक्काबुक्की

0

खडकी बाजार परिसरात पुन्हा होऊ लागले अतिक्रमण

खडकी : खडकी बाजार बसस्थानक परिसरात अतिक्रमण केलेल्या पथारी व्यावसायिकांवर कारवाई करण्यास गेलेल्या खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अतिक्रमण विरोधी पथकास काही पथारीवाल्यांनी धक्काबुक्की करून दमदाटी केल्याचा प्रकार रविवारी (दि.27) घडला. खडकी परिसरातील बस स्थानक, मोलेदिना रोड, टिकाराम जगन्नाथ चौक, आंबेडकर मार्ग, गांधी चौक, टांगा स्टॅन्ड आदी परिसरात अनधिकृत हातगाडीवाले व पथारी व्यावसायिकांनी अतिक्रमण करून वाहतूककोंडीत भर घातली आहे. त्यामुळे नागरिकांना व वाहनचालकांना समस्या निर्माण झाल्या आहेत. यावर पर्याय म्हणून खडकी पोलिस व कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने सहा महिन्यांपूर्वी अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेअंतर्गत खडकी बाजार परिसरातील अनेक बेकायदेशीर हातगाडी व पथारीधारकांवर कारवाई करून अतिक्रमणे दूर करण्यात आली. दुकानांसमोर केलेली वाढीव अतिक्रमणे ही या वेळी दूर करण्यात आली.

पथारीवाल्यांचा विरोध मोडून काढला
कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ अमोल जगताप तसेच अतिक्रमण पथक व खडकी पोलिसांचे यानिमित्ताने नागरिकांनी कौतुक केले. राजकीय पुढारी तसेच काही सदस्यांच्या हस्तक्षेपामुळे पुन्हा हळुहळु अतिक्रमणे वाढू लागली आहेत.कॅन्टोन्मेंट प्रशासनाने त्याची दखल घेत रविवारी दुपारी बसस्थानक परिसरात अतिक्रमण केलेल्या पथारी व्यवसायिकांवर कारवाई करीत असताना येथील काही पथारीवाल्यांनी प्रथम त्यास विरोध केला व त्यानंतर अतिक्रमण पथकातील अधिकारी व कर्मचार्‍यांना धक्काबुक्की व दमदाटी करण्यात आली. अतिक्रमण पथकाने पथारीवाल्यांचा विरोध मोडून काढीत यशस्वीरित्या कारवाई केली. मोलेदिना रोड, बसस्थानक शेजारील सुलभ शौचालयाजवळ तसेच टिकाराम चौक, आंबेडकर चौक व आंबेडकर मार्गावरील एस.एम.जोशी भवन ते गुरुद्वार दरम्यान रस्त्यालगत लागून अनधिकृत हातगाडी व पथारीवाल्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले असून या अतिक्रमणांवर ही कॅन्टोन्मेंट प्रशासनाने कारवाई करून खडकी परिसरात मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूककोंडी दूर करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

इतर ठिकाणांवरही कारवाई
कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अधिकारी विलास खांदोडे यांच्याशी या प्रकरणी संपर्क साधला असता ते म्हणाले, बसस्थानक परिसरात पथारी व्यवसायिकांवर अतिक्रमण विभागाच्या वतीने कारवाई मोहीम राबविण्यात आली. मात्र या वेळी कुठलाच अनुचित प्रकार घडला नाही. किरकोळ बाचाबाची व वादाचा प्रकार घडला. खडकी परिसरातील इतर ठिकाणच्या अतिक्रमणांवर ही कारवाई केली जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.