अतिक्रमण भोवले : रायपूर सरपंच, उपसरपंचासह तीन ग्रामपंचायत सदस्य अपात्र

रावेर : शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी तालुक्यातील रायपूर ग्रामपंचायतीच्या सरपंचांसह उपसरपंच व तीन ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र केल्याने राजकीय गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. सरपंच रुपेश पाटील, उपसरपंच तुकाराम तायडे, ग्रामपंचायत सदस्य रेखाबाई तायडे, माधुरी चौधरी व प्रकाश तायडे असे अपात्र झालेल्यांची नावे आहेत.

याचिकेत आढळले तथ्य
सरपंच पाटील, उपसरपंच तायडे व तिन्ही ग्रामपंचायत सदस्यांनी शासकीय जमिनीवर विना परवानगी अनधिकृतपणे अतिक्रमण केले. त्यावर पत्र्याच्या घराचे बांधकाम केलेले आहे. अतिक्रमीत जागेच लाभ एकत्र कुटुंबासह घेत असल्यामुळे त्यांना पदावर राहण्याबाबत अपात्र ठरविण्यासाठी मनोहर पाटील यांनी ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलमानुसार जिल्हाधिकार्‍यांकडे विवाद अर्ज दाखल केला होता. त्यावर सखोल चौकशी झाली. पदाधिकार्‍यांनी शासकीय गावठाण जमिनीवर शासनाची कायदेशीर परवानगी न घेता बेकायदेशीरपणे भोगवटा सदरी ग्रामपंचायत दप्तरी नावे लावून घेतले आहे. शासकीय जागा ताब्यात ठेवून लाभ घेत आहेत. पदाचा दुरुपयोग केला असल्याचे सिध्द झाल्यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी त्या पदाधिकार्‍यांना ग्रामपंचायत सदस्यपदी राहण्यास अपात्र ठरविले आहे.

अतिक्रमण नसल्याचा दावा ठरला फोल
स्वत:हून अतिक्रमण केलेले नाही. गावठाणची जागा ही शासकीय जागा असून त्यावरील भोगवटा हे अतिक्रमण समजले जावू शकत नाही. शेतकरी किंवा ग्रामस्थांना तात्पुरत्या वापरासाठी व ग्रामपंचयत महसूल वाढीसाठी त्या जागा देऊन कर आकारणी ग्रामपंचायत करीत असते त्यामुळे ते अतिक्रमण सिध्द होत नाही, असा बचाव पदाधिकार्‍यांकडून करण्यात आला. तो देखील जिल्हाधिकार्‍यांकडून फेटाळण्यात आला आहे. तक्रारदार पाटील यांच्यावतीने अ‍ॅड.विश्वासराव भोसले यांनी कामकाज पाहिले.