यावल : तालुक्यातील सौखेडासीम येथील ग्रामपंचायतीमधील पाच सदस्यांनी ग्रामपंचायतीसह शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याने त्यांना उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांनी शुक्रवारी अपात्र ठरवल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
दरम्यान तक्रार करण्यात आलेल्या एका सदस्याचे अतिक्रमण आढळून न आल्यामुळे त्यास अभय मिळाले आहे. दरम्यान, अपात्र सदस्यांमध्ये अलिशान सलीम तडवी, मुबारक सुभेदार तडवी, मुस्तुफा रमजान तडवी, सिकंदर इब्राहिम तडवी, साधना अकबर तडवी यांचा समावेश आहे.
अतिक्रमणामुळे गमावले सदस्यांनी पद
यावल तालुक्याच्या उत्तरेस सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या सौखेडासीम ग्रामपंचायतीत गेल्या वर्षी एकूण 13 सदस्य निवडून आले. पैकी एका अंगणवाडी सेविकाने ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा देऊन नोकरी पत्करली आहे. उर्वरीत 12 पैकी सहा सदस्यांच्या विरोधात दोन जणांनी जिल्हाधिकार्यांकडे तक्रार दिली. सौखेडासीम येथील सलीम मुसा तडवी यांनी ग्रामपंचायत सदस्य मुस्तुफा रमजान तडवी, सिकंदर इब्राहिम तडवी, साधना अकबर तडवी यांच्याविरोधात उपरोक्त सदस्यांनी व त्यांच्या कुटुंबियांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याची तक्रार करीत त्यांचे पद रद्द करण्याविषयी विनंती केली होती. त्यात उपरोक्त सिकंदर तडवी, मुस्तुफा तडवी, साधना तडवी या सदस्यांनी व त्यांच्या कुटुंबियांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केले असल्याचे सिद्ध झाल्यामुळे त्यांना अपात्र ठरवण्यात आले
तर ताहेर लतीब तडवी यांनी ग्रामपंचायत सदस्य नबाब महेमूद तडवी, अलिशान सलीम तडवी, व मुबारक सुभेदार तडवी यांच्याविरुद्ध उपरोक्त सदस्यांनी ग्रामपंचायत जागेवर अतिक्रमण केल्यामुळे त्यांना अपात्र घोषित करण्याची विनंती केली होती. पैकी नबाब तडवी व अलिशान तडवी यांनी ग्रामपंचायत जागेवर अतिक्रमण केले असल्याचे सिद्ध झाल्यामुळे त्यांना उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांनी अपात्र घोषित करण्यात आले.
एका सदस्याला मिळाला दिलासा
मुबारक तडवी यांनी अतिक्रमण केले असल्याचे सिध्द न झाल्यामुळे त्यांना कारवाईपासून अभय मिळाले आहे. दरम्यान उपरोक्त सदस्यांविरोधात उमेदवारी अर्ज दाखल वेळीच हरकत घेण्यात आली होती मात्र संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यावेळी दुर्लक्ष केले, असा आरोप अर्जदार यांनी केला आहे. एकूण तेरा सदस्यांच्या पंचायतमध्ये आता केवळ सात सदस्य उरले आहेत.