अतिक्रमण मोहिमेत पालिकेची दुटप्पी भूमिका

0

जनआधारच्या नगरसेवकांचा पत्रपरीषदेत आरोप; तीव्र आंदोलनाचा इशारा

भुसावळ । पालिकेने तीन दिवस राबवलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेत गोर-गरीबांचे अतिक्रमण हटवण्यात आले मात्र श्रीमंतांच्या अतिक्रमणाला अभय देण्यात आल्याने या दुटप्पी भूमिकेचा जनआधारच्या सर्व नगरसेवकांनी निषेध करीत तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पत्रकार परीषदेत दिला. प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर व सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांना या संदर्भात शुक्रवारी मागण्यांचे निवेदन देऊन न्याय देण्याची मागणी करण्यात आली.

भर पावसात जनआधारचे लाक्षणिक उपोषण
प्रांताधिकारी कार्यालयासमोर जनआधारच्या नगरसेवकांनी भर पावसातही दिवसभर लाक्षणिक उपोषण छेडत सत्ताधारी व पालिका प्रशासनावर पत्रपरीषदेत टिकेची झोड उठवली. माजी नगरसेवक जगन सोनवणे सत्ताधार्‍यांचा शासकीय भूखंडावर डोळा असल्याचे सांगत सत्ताधार्‍यांच्या अतिक्रमणाला अभय का? असा प्रश्‍न उपस्थित करीत सोयीनुसार अतिक्रमण हटवले जात असल्याचे सांगितले. नगराध्यक्ष व आमदारांनी स्मार्ट सिटी करून दाखवावी, असे आवाहनही त्यांनी केले.

घरकुल लाभार्थींना जागा द्या, टास्क फोर्स स्थापावी
गटनेता उल्हास पगारे म्हणाले की, घरकुलातील लाभार्थींना पर्यायी जागा द्यायला हवी होती. भर पावसात गरीबांचे अतिक्रमण काढून त्यांच्या सामानाचे नुकसान करण्यात आले. अ‍ॅड.तुषार पाटील म्हणाले की, टास्क फोर्स (ईटीएफ) स्थापण्याची मागणी त्यांनी केली.

विरोधकांचे अतिक्रमण तोडण्यासाठी सत्ताधार्‍यांचा दबाव
अशोक (आँऊ) चौधरी म्हणाले की, युवराज पाटील यांचे अतिक्रमण तोडण्यासाठी सत्ताधार्‍यांनी दबाव टाकला. भाजप नगरसेवकांच्या अतिक्रमणाला झुकते माप दिले जात आहे. दुर्गेश ठाकूर यांनी सर्वांना समान न्याय या तत्वावर अतिक्रमण हटवण्याची मागणी केली. रवी सपकाळे यांनी आपले ते अतिक्रमण नसल्याचे सांगत सत्ताधार्‍यांचे अतिक्रमण हटवण्याची मागणी केली. प्रदीप देशमुख म्हणाले की, ज्या-ज्या ठिकाणचे अतिक्रमण हटवण्यात आले नाही त्याची यादी आम्ही सहाय्यक पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांना देणार असून त्यांनी बंदोबस्त देण्याचे आश्‍वासन देत पालिकेला पत्र देणार असल्याचे आश्‍वासन दिल्याचे सांगितले. नितीन धांडे म्हणाले की, व्यायामशाळेचे अतिक्रमण तोडताना वेळ देण्यात आला नाही शिवाय साहित्याचे मोठे नुकसान झाले. युवराज पाटील म्हणाले की, अतिक्रमण हटवताना पक्षपात झाला. यामागे सत्ताधार्‍यांचा दबाव आहे.