राजकीय पुढारी व धनदांडग्यांचे अतिक्रमणास अभय दिल्याने विविध स्तरातून निषेध
भुसावळ । गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेली पालिकेची अतिक्रमण विरोधी मोहिम नुकतीच समाप्त झाली. यात पालिकेने शहरातील बरीच अतिक्रमणे हटवली मात्र जळगाव रोडवरील घरकुलांमध्ये अनधिकृतपणे निवास करणार्या कुटुंबांचे अतिक्रमण काढून त्यांना बेघर केले. भर पावसात या गोरगरिबांना आपला सामान घेऊन घराबाहेर पडावे लागले मात्र राजकीय पुढारी व धनदांडग्यांच्या अतिक्रमणाला पालिकेने अभय दिले असून अतिक्रमण हटाओ मोहिमेतून पालिकेने गरीबांवर हातोडा मारल्याची संतप्त टीका जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस विवेक नरवाडे यांनी केली आहे. या संदर्भात नरवाडे यांनी प्रसिध्दी पत्रक जाहीर करून पालिकेच्या दुजाभावी कारभारावर टीका केली आहे.
आर्थिक देवाण-घेवाण केल्याचा आरोप
शहरातील पालिका संकुलावरील तसेच खुल्या जागेवरील मंगल कार्यालयांचे अतिक्रमण काढण्याची मागणी पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये केली आहे. सर्वोच्च न्यायालय व नाशिक विभागीय आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार मुख्याधिकारी बाविस्कर यांनी कारवाई न करता आर्थिक हितसंबंध जोपासल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. अतिक्रमण हटाओ मोहिमेत फक्त गरीबांचेच अतिक्रमण काढले मात्र साई पॅलेस, जनता टॉवर, साई डेअरी, राजपूत चायनीज, अग्निशमन केंद्रावरील अनधिकृत हॉटेल, हॉटेल हेवन, शिवाजी कॉम्प्लेक्सवरील इतर बांधकामे व इतर १३ ठराव निलंबित झालेल्या जागेवरील पक्की बांधकामे पाडण्याची कारवाई मुख्याधिकार्यांनी केली नाही. त्यामुळे या कारवाईवर पाटील यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.