जळगाव । महानगरपालीकेतर्फे मंगळवारी विशेष अतिक्रमण निर्मुलन मोहिमेस राबविण्यात आली या मोहीमेत शहरातील विविध भागात अतिक्रमण धारकांवर कारवाई करण्यात आली. मंगळवारी सकाळी 9.30 वाजता अतिक्रमण निर्मुलन विभागाचे अधीक्षक एच.एम.खान यांच्या नेतृत्वाखाली गणेश कॉलनी परिसरातून मोहिमेला सुरुवात करण्यात आली असतांना शहरातील विविध भागातील सिंधी कोलनी, सुभाष चौक, महात्मा फुले मार्केट परीसर, गणेश कॉलनी आदी ठिकाणी मोहम राबवण्यात आली. यादरम्यान, ख्वॉजामिया चौक व महात्मा फुले मार्केट परिसरात अतिक्रमण विभागाचे कर्मचारी व विक्रेत्यांमध्ये चांगलेच खटके उडाले होते. फुले मार्केटमधील फळविके्रत्यांनी अतिक्रमण विभागाच्या कर्मचार्यांवर फळ व दगडफेक करण्यात आल्याने काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
सिंधी कॉलनीत दगडफेक;
नगरपालीकेच्या काही कर्मचार्यांवर मोहीमे दरम्यान गर्दीतुन दगड व फळे मारण्यात आल्यामुळे काही काळ फुले मार्केटमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली होती.तर गणेश कॉलनी परिसरातील अतिक्रमण काढल्यानंतर सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास ख्वॉजामिया चौक परिसरात अतिक्रमण मोहीम राबवत असताना मनपा कर्मचार्यांनी या ठिकाणी लावण्यात आलेल्या फळ विक्रेत्यांचा गाडीवरील माल जप्त करायला सुरुवात केली. काही विक्रेत्यांनी मनपा कर्मचार्यांकडे जप्त केलेला माल परत करण्याची मागणी केली असता कर्मचार्याने विरोध केल्याने सुरुवातीला मनपा कर्मचार्यांशी फळविक्रेत्यांनी शाब्दीक चकमक होवून भांडणात रुपांतर झाले. एका फळ विक्रेत्याने मनपा कर्मचार्याला मारण्यासाठी चक्क लोखंडी पाईप उचलला. दरम्यान, यामुळे काही काळ धावपळ देखील उडालेली पहायला मिळाली.
पथकास मारहाणीची तक्रार
जळगाव शहरातील सिंधी कॉलनीत अतिक्रमण मोहीम सुरु असतांना दुपारी चार वाजता महापालिका कर्मचार्यांनी हातगाडीधारकांचा माल व गाड्या जप्त केल्याने संतप्त विक्रेत्यांकडुन तिव्र विरोध करण्यात आला. यावेळी अतिक्रमण पथक व विक्रेत्यांमध्ये शाब्दीक बाचाबाची होवून विक्रेत्यांनी कर्मचार्यांना मारहाण केल्याचा आरोप अतिक्रमण पथकाने केला व विक्रेत्यांनी फळांसह दगडफेक करीत कारवाईस विरोध केल्याने काहीकाळ अशांतता निर्माण झाली.