भुसावळ। शहरातील अतिक्रमण हटविण्याच्या सुचना पालिका प्रशासनाने दिल्याने अनेकांचे व्यवसाय बंद होऊन उपासमारीची वेळ येणार आहे. पालिका प्रशासनाने अतिक्रमण हटविण्यापूर्वी उपजीविका संरक्षण आणि विनिमय कायद्यानुसार समितीची स्थापना करावी तसेच रस्त्यालगतच्या व्यावसायिकांना रोजगारासंदर्भात संरक्षण देण्याची मागणी शिवसेनेतर्फे करण्यात आली. यासंदर्भात प्रांताधिकारी कार्यालयात शुक्रवार, 11 रोजी निवेदन देण्यात आले.
रस्त्यावरील विक्रेत्यांना मिळावी उपजीविकेची हमी
रस्त्यावर, फुटपथावर किंवा रस्त्याच्या कडेला बसून व्यवसाय करणार्या किरकोळ विक्रेत्यांसाठी केंद्र सरकारने रस्त्यावर विक्री करणार्या हातगाडीधारकांच्या संरक्षण देणारा कायदा संसदेत मंजूर करुन गरीबांना हक्काचा व्यवसाय करण्यासाठी परवानगी दिली. या व्यावसायिकांना कायदेशीर संरक्षण, उपजीविकेची हमी आणि सामाजिक सुरक्षेचा मूलभूत अधिकार देणे गरजेचे आहे.
दखल न घेतल्यास 19 रोजी आंदोलन
आधीच मागील 5 वर्षापासून रोजगार संबंधी उपाययोजना नाहीत. या प्रकाराने शहर व्यवस्थापनास मदत होईल, युवकांना असंख्य रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील तसेच गुन्हेगारीवर आळा घालता येईल असे प्रा.धिरज पाटील यांनी सांगितले. शिवसेना 19 रोजी प्रांत कार्यालयासमोर आंदोलन छेडणार आहे.
स्ट्रीट वेंडींग समिती
उपजीविका संरक्षण आणि विनिमय विधेयकाच्या अंमलबजावणीसाठी पालिका क्षेत्रात स्ट्रीट वेंडिंग समिती स्थापन करण्याची सूचना केली आहे. या समितीमध्ये मुख्याधिकारी, वाहतूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी, फेरीवाल्यांचे प्रतिनिधी, रहिवासी कल्याण संस्थेचे सदस्य, व्यापारी संस्थेचे प्रतिनिधी आणि महिला प्रतिनिधी यांचा समावेश पाहिजे. ही समिती अतिक्रमण काढण्याआधी स्थापन करावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने प्रांताधिकारी यांना करण्यात आलेली आहे.