अतिक्रमण हटविताना महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत

0

ठाणे : अतिक्रमण हटाव पथकाची कारवाई एका महिलेच्या चांगलीच जीवावर उठली असल्याचा प्रकार समोर आला आहे. केडीएमसीच्या फेरीवाला हटाव पथकाने रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या एका महिलेला मारहाण करुन सामानाची तोडफोड केली. या मारहाणीत फेरीवाल्या महिलेचे डोके फुटल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. रानी मुर्गदास वड्यार असे मारहाणीत जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.

डोंबिवली पश्चिमेतील स्टेशन परिसरात मंगळवारी सायंकाळी केडीएमसीच्या अतिक्रमण हटाव पथकाने फेरीवाल्यांना हुसकावण्याची कारवाई सुरू केली. घनश्याम गुप्ते रोडला १५० मीटरच्या बाहेर बसलेल्या फेरीवाल्या महिलांना या पथकाने हुसकावून लावले. फुलांची टोपली घेऊन बसणारी रानी वड्यार ही महिलादेखील या पथकाला पाहून तेथून पळाली. मात्र, पथकातील बुवा नामक कर्मचाऱ्याने या महिलेची टोपली हिसकावण्याचा प्रयत्न केला. या धक्काबुक्कीत रानी वड्यार रस्त्यावर आदळली. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन हाता-पायाला देखील मार बसला. हे पाहून बुवाने फेरीवाला हटाव पथकासह तेथून पळ काढला.

दरम्यान जखमी राणी वाड्यार यांना दुखापतीनंतर पोलीस ठाण्यात घेऊन गेल्यानंतर पोलिसांनी त्यांची तक्रार न घेता हॉस्पिटलला नेण्याचे सांगितले. पोलिसांनी तक्रार करताना तोल गेल्यामुळे पडल्या असे सांगत रिपोर्ट करण्याचा दबाव दिल्याचे पीडीतेसोबत असलेल्या एका महिलेने सांगितले. तसेच दवाखान्यात देखील तात्पुरती मलमपट्टी करून एडमिट करून न घेतल्याचे त्या महिलेने सांगितले. हा सर्व प्रकार रस्त्यावरील बघ्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये कैद केला. जमावातील काहींनी या महिलेला विष्णूनगर पोलीस ठाण्यात नेले. जखमी महिलेवर तेथे उपचार करण्यात आले. तेथून पुन्हा या महिलेला पोलीस ठाण्यात आणले. तेथे तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी बुवा भंडारी यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. या महिलेला त्रास जाणवू लागल्याने तिला पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. ही महिला पडल्यामुळे तिला दुखापत झाली. आमच्यापैकी कुणीही तिला मारहाण केली नसल्याचे दिलीप भंडारी यांनी सांगितले आहे.