नवी मुंबई । ऐरोली येथील मनपाच्या सुसज्ज अशा रुग्णालयात शिशु अतिदक्षता विभाग नसल्यामुळे गरजू व गरीब पालकांना हजारो रुपयांचा आर्थिक फटका बसत आहे. असाच आर्थिक फटका घणसोलीतील एका दाम्पत्याला बसल्याने घरातील असलेले थोडेफार सोने गहाण ठेवून खासगी रुग्णालयाची देणी द्यावी लागल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान, याच रुग्णालयातील एका वैद्यकीय अधिकार्याने एक सामाजिक बांधिलकी म्हणून नवीन पनवेलमधील रुग्णालयाशी संपर्क साधून अल्प दरात सहकार्य करण्याची विनंती केली. परंतु, आधी हो बोललेल्या खासगी डॉक्टरांनी नंतर आपले दात दाखवून अव्वाच्या सव्वा बिल घेऊन विश्वासाची बोळवण केली. यामुळे खासगी डॉक्टर कोणत्याही प्रकारची दयामाया दाखवत नसल्याचे सिद्ध झाल.
घणसोली गावातील साई सदानंद नगर मधील गरोदर माता सुप्रिया गणेश मोरे यांना ऐरोली येथील मनपा रुग्णालयात 29 जानेवारी रोजी दाखल केली.त्याच दिवशी नैसर्गिक बाळंतपण झाले व पुत्ररत्नाचा लाभ झाला. त्यानंतर बाळाची तब्येत बिघडल्याने त्याला अतिदक्षता विभागात ठेवल्याशिवाय पर्याय नसल्याचे उपस्थित असणार्या बालरोग तज्ज्ञांनी सांगितले. त्यानंतर वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयात शिशु अतिदक्षता विभागात जागा आहे का याचा शोध घेतला गेला. परंतु, तिथेही अतिदक्षता विभाग अपेक्षित असे कार्य करत नसल्याने नवजात शिशूला खासगी रुग्णालयात दाखल करण्याचे ठरले.परंतु खासगी रुग्णालयात खर्च जास्त असल्याने दाम्पत्य सुप्रिया मोरे व गणेश मोरे यांना काय करावे असा यक्षप्रश्न पडला. शेवटी ऐरोली रुग्णालयातील बाळ रोग तज्ज्ञांची ओळख असलेल्या नवीन पनवेल, सेक्टर 19 येथील मोहिते रुग्णालयात दाखल केले. दिवसाकाठी दोन हजार रुपये खर्च येईल, असे सांगून नवजात शिशूला त्या रुग्णालयात पाठवण्यात आले. त्यानंतर बाळाला दाखलही केले गेले. त्यानंतर पैशांची ससेमिरा सूरु झाला. बाळाला दाखल केल्या नंतर पाहिले 15 हजार रुपये भरा अशा प्रकारचे रुग्णालयातून सांगण्यात आले. डॉक्टरांनी सांगितलेली औषध त्यांच्याच मेडिकलमधून आणण्याची सक्ती करण्यात आली.तसेच या रुग्णालयात नवजात शिशूच्या मातेला बसण्यास योग्य जागा नसल्याने कुठे थांबावे असा प्रश्न पडला होता. याच रुग्णालयात थांबायचे म्हणजे साडेतीन हजार रुपये खर्च करून रूम घ्यावे लागले. दरदिवशी दोन हजार खर्च येईल या अपेक्षेने गेलेल्या मोरे दाम्पत्याला अतिदक्षता विभागाचा फक्त दहा दिवसांचा बिल 38 हजार रुपये आल्याने त्या दाम्पत्याच्या पाया खालची मातीच सरकली.
खर्च दहा ते बारा हजार
तसेच औषधाचा खर्च दहा ते बारा हजार आल्याने एकूण खर्च 50 हजाराच्या वर गेल्याने मोरे कुटुंबीयांना आपल्या घरातील सोने गहाण ठेऊन रुग्णालयाची देणी भागवावी लागल्याने पहिली रत्नकन्या व नंतर पुत्र रत्नाचा लाभ झालेल्या मोरे दाम्पत्याला आर्थिक स्थिती नाजूक असलेल्या दुःखाचा सामना करावा लागला. यामुळे मनपा रुग्णालये सर्व शक्तीनिशी सुरू करणे काळाची गरज असल्याचे मत गणेश मोरे यांनी सांगितले.