अतिदुर्गम भागातील शाळेत महिला शिक्षकांची बदली नको

0

पुणे । जिल्हा परिषदांच्या अंतर्गत अवघड क्षेत्राच्या अंतर्गत ज्या शाळा घोषित करण्यात आलेल्या आहेत व शाळा ज्या अतिदुर्गम भागात आहेत. अशा महिला शिक्षकांची नियुक्ती तसेच बदलीही करू नये, असे आदेश राज्य शासनाने सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना दिले आहेत.जिल्हा परिषदेच्या काही शाळा दुर्गम व अतिदुर्गम भागात आहेत. काही शाळांकडे जाताना जंगलातून वा निर्जन ठिकाणावरून जावे लागते. काही शाळा ज्या ठिकाणी आहेत, तेथील स्थानिक परिस्थितीमुळे शिक्षकांना मुक्काम करणे देखील अडचणीचे होते. तरी अशा ठिकाणी पुरुष शिक्षकांबरोबर महिला शिक्षक देखील काम करीत आहेत.या सर्व गोष्टींचा विचार करून दुर्गम भागात महिला शिक्षकांनी नियुक्ती न करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे

मे महिन्यात बदली प्रक्रियेसाठी अर्ज करावेत
महिला शिक्षकांना प्रतिकूल घोषित केलेल्या शाळामध्ये महिला शिक्षकांना प्रशासकीय बदलीने अथवा नियुक्तीने पदस्थापना देण्यात येऊ नये. सध्या अशा जागी काही महिला कार्यरत असल्यास, त्यांनी येत्या मे महिन्यात होणार्‍या बदली प्रक्रियेत अर्ज करावेत. महिलांसाठी प्रतिकूल म्हणून घोषित केलेल्या शाळेवर सध्या कार्यरत असणार्‍या महिला शिक्षकांना बदलीचा अधिकार राहणार असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.