अतिधोकादायक इमारतीतील रहिवाशांचे स्थलांतरण करावे

0

पुणे । अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण होते. धरण पूर्ण भरल्यानंतर विसर्गात वाढ केली जाते. त्यावेळी धरणाखालील गावांना धोका होऊ शकतो. अशा परिस्थितीत सर्व यंत्रणांनी सतर्क राहून लोकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी. महानगरपालिका हद्दीमध्ये अतिधोकादायक इमारतीमध्ये राहत असलेल्या लोकांना अन्यत्र स्थलांतरण करण्याची खबरदारी घ्यावी, अशी सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिले.विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली मान्सूनपूर्व तयारीबाबत आढवा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आदींसह सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

मान्सूनपूर्व तयारीचा घेतला आढावा
सुरुवातीस विभागीय आयुक्तांनी सर्व विभागांचा मान्सूनपूर्व तयारीबाबात केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. विभागातील सर्व यंत्रणांनी त्यांचे स्तरावर केलेल्या उपाययोजनांची माहिती सादर केली. विभागातील सर्व यंत्रणांनी त्यांचे स्तरावर 24 तास नियंत्रण कक्ष सुरु केले असून, नियंत्रण कक्षांत अधिकरी कर्मचार्‍यांची नियुक्ती केलेली आहे. तसेच विभागीय आयुक्त कार्यालय पुणे येथे नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली असून चोवीस तास कार्यरत आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांचे कार्यक्षेत्रातील ज्या पुलाचे ठिकाणी सेन्सर बसविण्यात आलेले नाहीत, अशा ठिकाणी 24 तास देखरेखीकरीता गँगमनची नेमणूक करावी, पावसाळासुरु झाल्यानंतर पावसाचे पाण्याने सुरवातीचे 2-3 आठवडयामध्ये दूषीत पाणीपुरवठा होणार नाही, याची काळजी आरोग्य विभागाने कटाक्षाने घ्यावयाची आहे. त्यासाठी पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमध्यसे दूषीत पाणी मिसळणार नाही, याची देखील काळजी घेतली पाहिजे. साथीच्या आजाराकरीता पुरेसा औषधांचा साठा शासकीय रुग्णालयांना उपलब्धकरुन द्यावा. कृषी विभागाने, अतिवृष्टी पिकांच्या झालेल्या नुकसानीचा पंचानामा करताना योग्य ती खबरदारी घ्यावी. पावसाने ओढ घेतल्यास दुबार पेरणी परिस्थिती निर्माण झाल्यास बियाणे उपलब्धता, पीक नियोजन याबाबत कार्यवाही करावी, असे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

भुस्खलनसदृष्य ठिकाणांचे सर्व्हेक्षण करावे
एनडीआरएफमार्फत जास्तीत जास्त लोकांना आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याच्या दृष्टीने प्रशिक्षण देण्यात यावे. पुणे जिल्ह्यातील माळीण गावी झालेल्या भूस्खलनासाख्या परिस्थितीत उपाययोजना करण्याकरिता सर्वेक्षण करुन अशी ठिकाणे निश्‍चित करावी. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ यांनी केबल पाण्याखाली जाऊन किंवा ओव्हरहेड वायर तुटल्याने विद्युत प्रवाह प्रवाहीत होणार नाही, यासाठी त्या ठिकाणचा विद्युत पुरवठा तात्काळ बंद करणे आवश्यक आहे. सर्वांनी केलेल्या पूर्वतयारीनुसार सर्व यंत्रणांशी समन्वय ठेवावा. तसेच एनडीआरएफ मध्ये दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसर सर्व जिल्ह्यांमध्ये एकसूत्रता ठेवावी, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी या बैठकीत दिल्या.