पिंपरी-चिंचवड ः हवा गुणवत्तेच्या बाबतीत महाराष्ट्रातील 20 शहरे धोक्याच्या पातळीत आली असून अतिप्रदूषित आहेत. पिंपरी-चिंचवडचा देखील अतिप्रदूषित शहरामध्ये समावेश आहे. पिंपरीने राष्ट्रीय हवा गुणवत्ता मानकाची पातळी ओलांडली आहे. अधिक हवा प्रदूषित शहराचा यादीत पिंपरी-चिंचवडचा समावेश झाला आहे. ग्रीनपीस इंडिया या पर्यावरण संस्थेच्या वतीने सादर केलेल्या पर्यावरणीय अहवालातून ही माहिती समोर आली आहे. या संस्थेच्या अहवालानुसार केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने केवळ 122 सर्वाधिक प्रदूषित शहरे ओळखली आहेत. ही 122 शहरे 28 राज्ये आणि नऊ केंद्रशासित प्रदेशातील आहेत. त्यातील 166 शहरांनी राष्ट्रीय हवा गुणवत्ता मानकाची मर्यादा ओलांडली आहे. हवेतील अतिसूक्ष्म कणांबाबत (पीएम 10) मुंबई शहर सर्वाधिक प्रदूषित ठरले आहे. त्याचबरोबर डोंबविली, चंद्रपूर, उल्हासनगर, ठाणे, पुणे, अमरावती, नागपूर, जालना, लातूर, कोल्हापूर, पिंपरी-चिंचवड, नाशिक, सांगली, जळगाव, अकोला, सोलापूर, नवी मुंबई, औरंगाबाद आणि भिवंडी शहरातील हवेची गुणवत्ता मानकापेक्षा आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या मापदंडापेक्षा आठपठ अधिक आहे. समितीच्या अहवालानुसार पिंपरी-चिंचवड शहराचा नव्याने मानकापेक्षा अधिक हवा प्रदूषित शहरांच्या यादीत समावेश झाला आहे.