अतिमहत्त्वाकांक्षेचा बळी

0

द ग्रेट शो मन रजनीकांतवरील मागच्या स्तंभात मी त्याच्या पडेअप्पा या चित्रपटाचा दाखला दिला होता. अतिमहत्त्वाकांक्षा नेहमीच माणसाचा बळी घेते, अशा अर्थाचा एक संवाद त्यात रजनीच्या तोंडी आहे. खलनायिकेला उद्देशून रजनीने त्या चित्रपटात हा संवाद म्हटला आहे. अण्णा द्रमुकमध्ये सध्या सुरू असलेल्या घडामोडीत शशिकलाच खलनायक ठरल्या असून, अतिमहत्त्वाकांक्षेपायी आता शशिकलांचाच राजकीय बळी जाणार हे जवळपास निश्‍चित झाले आहे. हाही एक योगायोग म्हणावा लागेल. पण हा जुळून आलेला योगायोग नसून जुळवून आणला गेलेला आहे आणि शशिकला यांची यापेक्षा वेगळी गत होणारही नव्हती. फक्त ती एवढ्या लवकर होईल, याची अपेक्षा नव्हती. या राजकारणातला नवा भाग आहे, तो हा. अण्णा द्रमुकच्या दिवंगत सर्वेसर्वा जयललिता यांच्या प्रमाणेच आपणही पक्ष आणि सरकार ताब्यात घ्यावे, ही शशिकलांची महत्त्वाकांक्षा होती. जयललिता हयात असतानाही शशिकला यांना तशी स्वप्ने पडत होती आणि वास्तवाचे भान नसल्याने केलेल्या उद्योगांमुळे वैतागून जयललिता यांनी शशिकलांना हाकलूनही दिले होते. त्यातून शशिकला काहीच शिकल्या नाहीत. अम्माच्या निधनामुळे आता चिन्नम्मा बनून आपण आपले हे स्वप्न पुरे करू शकतो, असे त्यांना वाटत होते. त्यातून त्यांनी घाईघाईने पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. राजकारणात अशी घाई चालत नाही, हा धडा जयललितांबरोबर राहूनही शशिकलांनी गिरवला नव्हता. त्याचाच परिपाक म्हणून त्यांना तुरुंगाची वारीही करावी लागत असून, पुढील दहा वर्षे मुख्यमंत्रिपदही भूषविता येणार नाही. एकापरीने त्यांचा राजकीय प्रवास या शिक्षेने थांबलाच होता. आता पुतण्या दिनकरनच्या उद्योगांमुळे शशिकलांचे राजकीय अस्तित्वच संपुष्टात येवू घातले आहे.

जयललितांना वास्तवाची जाण होती. केवळ पक्ष हातात असून चालणार नाही. राज्याची सत्ता हातात असली, तर काहीही करता येते, हे त्या जाणून होत्या. त्यामुळेच त्या आपल्या प्रतिमेचा वापर करून राज्यात पक्षाची एकहाती सत्ता आणत होत्या. कोणत्याही निवडणुकीत पक्षाला विजयी करून देण्याचा करिष्मा त्यांच्याकडे होता. सत्ता माणसाला कसे बळ देते, हेही जयललितांनी अनुभवले होते. करुणानिधींच्या द्रमुकने जयललितांचा भर विधानसभेत अवमान केला होता. जयललिता ते कधीच विसरल्या नव्हत्या. त्यामुळे वृद्ध आणि आजारी करुणानिधींना घरातून खेचून बाहेर काढून न्यायालयात फरपटत नेऊन जयललितांनी बदला घेतला होता. करुणानिधींसारख्या माणसाशी असे वर्तन करण्याची धमक केवळ सत्तेमुळे येते, हे जयललिता कधीच विसरल्या नव्हत्या.

शशिकला यांच्याकडे असा करिष्मा नाही. चिन्नम्मा म्हणून स्वतःला प्रोजेक्ट केले, तरी फार तर दहा-वीस आमदारच त्या निवडून आणू शकतात. ओ. पनीरसेल्वम किंवा पक्षाच्या अन्य नेत्यांना याची जाणीव होती. सत्ता मिळाली, तरी तिचा वापर करण्याचीही एक कला असते आणि ती अंगी बाणवावी लागते. शशिकला त्या कलेतही पारंगत नाहीत. पण ओ. पनीरसेल्वम या विषयात नक्कीच वरच्या वर्गात गेलेेले आहेत. त्यामुळेच जयललितांच्या निधनानंतर पक्ष आणि सरकारला स्थैर्य मिळवून देण्यासाठी त्यांनी केंद्रातील सत्तारूढ भारतीय जनता पक्षाशी सौहार्दाचे संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न चालवला होता. त्याचा अर्थ शशिकला यांच्यासह पक्षाच्या अनेक नेत्यांना लागला नाही.

तामीळनाडूत द्रमुक हा बलवान पक्ष आहे आणि तोच अण्णा द्रमुकला हरवू शकतो. जयललिता यांच्या पश्‍चात अण्णा द्रमुकचे एकहाती सरकार सत्तेवर आणण्याची धमक पक्षाच्या कोणत्याही नेत्यात नाही. पनीरसेल्वम यांची प्रतिमा चांगली आहे आणि काम करणारा मुख्यमंत्री म्हणून तामीळ जनतेचा त्यांना पाठिंबा मिळत असला, तरी तेही अण्णा द्रमुकची एकहाती सत्ता आणू शकत नाहीत. फार तर पन्नास आमदार ते निवडून आणू शकतात. पण तेवढ्यावर सत्ता स्थापन करता येत नाही, या वस्तुस्थितीचे भान पनीरसेल्वम यांना होते.

द्रमुकची गोष्ट अगदी उलटी आहे. करुणानिधी यांनी आपला वारसदार निवडला असून, आता पक्ष त्याच्याच हातात आहे. करुणानिधींचे धाकटे चिरंजीव एम. के. स्टॅलिन हा तो वारसदार. स्टॅलिन यांना निवडणुकीचे शास्त्र चांगलेच अवगत असून, पक्षात त्यांना मानणार्‍या तरुण नेत्यांची संख्याही सर्वाधिक आहे. मुख्य म्हणजे राजकारणाच्या परिघाबाहेर राहिलेल्या तरुणांना स्टॅलिन यांनी राजकारणात आणल्याने या तरुण नेत्यांना काही तरी करून दाखवण्याची इच्छा आहे. तसेच, स्टॅलिन स्वतःच्या बळावर तामीळनाडूत द्रमुकचे सरकार आणू शकतात. आज स्टॅलिन यांच्या तोडीचा एकही नेता तामीळनाडूच्या राजकारणात नाही. हे ऐकायला किंवा वाचायला अप्रिय किंवा अतिशयोक्ती वाटले, तरी वास्तव आहे. या वास्तवाचे भान पनीरसेल्वम यांना असल्यानेच त्यांनी प्रारंभीच्या काळात शशिकला यांचे नखरेही सहन केले. पण शशिकलांच्या महत्त्वाकांक्षेला नको ते पंख फुटल्याने अखेर पनीरसेल्वम यांनी बंडाचे निशाण फडकावले.

दिनकरन यांच्यासारख्या वादग्रस्त नेत्याने नको ते गुण उधळण्यास सुरुवात केल्याने द्रमुकला मोकळे रान मिळाले आहे. त्याची जाणीव झाल्यानेच लाचखोरीचा मुद्दा पुढे करत अखेर दिनकरन व शशिकला यांनाच पक्षातून काढून टाकण्याचा निर्णय अण्णा द्रमुकला घ्यावा लागतो आहे. पक्षाची प्रतिमा मलिन होत राहिली, तर पुन्हा कधी निवडूनही येता येणार नाही, ही भीती पक्षाचे आमदार, खासदारांना वाटत असून, ही भीती हेच या कारवाईमागचे कारण आहे. आता पनीरसेल्वम व मुख्यमंत्री इडाप्पडी पलानीस्वामी यांच्यात दिलजमाईची चर्चा सुरू आहे. पनीरसेल्वम यांना पुन्हा मुख्यमंत्री करणे आणि पलानीस्वामी यांनी उपमुख्यमंत्री म्हणून पनीरसेल्वम यांना साथ देणे, असे तडजोडीचे कलम निघून त्याची अंमलबजावणी झाल्याचे दिसल्यास नवल वाटू नये.

तामीळनाडूच्या राजकारणातील हे बदल भाजपने फार चाणाक्षपणे जाणले आहेत. विशेषतः आता स्टॅलिन हाच एकमेव भक्कम नेता तामीळनाडूत उरला आहे. अन्य पक्षांकडे असे नेतृत्व नसणे, हीच आपल्यासाठी संधी असल्याचे भाजपने हेरले असून, तामीळनाडूत पाय रोवण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न सुरू केले आहेत. अण्णा द्रमुक किंवा द्रमुकपासून भाजपने समान अंतर राखतानाच पनीरसेल्वम यांना छुपा पाठिंबाही देणे सुरू ठेवले आहे. तामीळनाडूतील पुढील लोकसभा निवडणुकीत पक्षाला कमी का असेना पण यश मिळाले पाहिजे, ही भूमिका ठेवून भाजपने रणनीती आखली आहे. तामीळनाडूत लोकसभेच्या अगदी दोन-तीन जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले, तरी भाजपसाठी ती मोठी कमाई असेल आणि त्यातून भाजपलाही हुरुप मिळेल. तामीळनाडूच्या राजकारणातील ही पोकळी काँग्रेसलाही जाणवली आहे. परंतु, ती भरून काढण्यासाठी काँग्रेस काहीच प्रयत्न करताना दिसत नाही. तामीळनाडूतील राजकारण असे कुस बदलत असून, त्यात भाजप तेथे पाय रोवण्यात किती यश येईल? याकडे जाणकारांचे लक्ष लागले आहे.

गोपाळ जोशी – 9922421535