पुणे । चित्रकलेचे अतिरिक्त गुण हवे असतील, तर संचालकांचा शिक्का आणा, असे सांगणारी जाचक अट अखेर शिक्षण विभागाने मागे घेतली आहे. त्याचबरोबर एलिमेंटरी व इंटरमिजिएट अशा दोन्ही परीक्षा उत्तीर्ण करण्याची अट 2019 पासून लागू होणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे.राज्यातील इयत्ता दहावीच्या कला क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण देण्याचा निर्णय गेल्या वर्षीपासून राज्यमंडळाने लागू केला. या वर्षी त्याच्या निकषांमध्ये काही बदलही करण्यात आले. त्यानुसार चत्रकलेच्या परीक्षांमधील प्रावीण्यासाठी अतिरिक्त गुण हवे असल्यास कला संचालकांचीच स्वाक्षरी आणि शिक्का आणण्याची अट विभागाने घातली होती. मात्र राज्यभरातील विद्यार्थ्यांना तेवढ्या एका कारणासाठी मुंबईला येऊन स्वाक्षरी घ्यावी लागत होती. तसेच हा निर्णय घेतल्यानंतर प्रमाणपत्र घेऊन त्यावर सही शिक्का घेण्याच्या अटीमुळे विद्यार्थ्यांना खूप धावपळ व मनस्ताप सहन करावा लागला होता.
पालक, शिक्षकांचा आक्षेप
परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र कला संचालनालयाकडूनच देण्यात येते. त्यावर आवश्यक सर्व तपशील असतात असे असताना, स्वतंत्र प्रमाणपत्राची गरज काय? असे प्रश्न उपस्थित करत या अटीवर पालक, शिक्षकांकडून आक्षेप घेण्यात आला. त्या पार्श्वभूमीवर कला संचालकांच्या स्वाक्षरी आणि शिक्क्याची अट शिक्षण विभागाने मागे घेतली आहे. यापुढे चित्रकलेसाठीच्या अतिरिक्त गुणांसाठी मुख्याध्यापक किंवा केंद्रप्रमुखांची स्वाक्षरी आणि शिक्का चालणार आहे. या गुणांसाठी एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट अशा दोन्ही परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक करण्यात आले होते. त्यावरही विद्यार्थी आणि शिक्षकांकडून आक्षेप घेण्यात आला होता. ही अट वर्षाच्या सुरुवातीपासून विद्यार्थ्यांना माहिती असणे आवश्यक होते, असे शिक्षकांचे म्हणणे होते. दोन्ही परीक्षा उत्तीर्ण असण्याची अट देखील यंदापुरती मागे घेण्यात आली आहे. पुढील वर्षीपासून लागू करण्यात येणार आहे.