भुसावळ स्थानकावर सफाई कर्मचार्यामुळे प्रकार उघड
2 वर्षापासून घर सोडून झाला होता महाराज
जळगाव : बीड जिल्ह्यातील नांदुरघाट येथील शिक्षकाला 15 वर्ष नोकरी केल्यानंतर संस्थेने अतिरिक्त ठरविले, यानंतर पुन्हा कुठेच नियुक्ती न मिळाल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या शिक्षकाने दोन वर्षापूर्वी घर सोडून संन्यास पत्करला. सुरेश हरिदास जाधव (वय 44) असे मयत शिक्षकाचे नाव आहे. असून बेपत्ता असलेल्या या शिक्षकाचा 14 रोजी सकाळी भुसावळ रेल्वे स्थानकावरील एका रेल्वेत सफाईकामगारांना मृतदेह आढळून आला. आधारकार्डवरुन त्याची ओळख पटवली.
सुरेश हरिदास जाधव हे बीड जिल्ह्यातील विडा येथील हनुमान विद्यालयात शिक्षक होते. 15 वर्षानंतर त्यांना अतिरिक्त ठरविण्यात येवून अंबाजोगाईतील कुमकुम लोड विद्यालयात नियुक्ती देण्यात आली. तेथे ते रुजू झाले नाही. त्यांना परत हनुमान विद्यालयात पाठविण्यात आले. तेथे रुजू झाल्यानंतर त्यांचे पगार थकविण्यात आले होते. यामुळे त्यांना वैफल्याने ग्रासले होते. यामुळे जोवर पगार मिळत नाही तोवर घरी येणार नाही, असे म्हणत त्यांनी घरदार सोडले.
संन्यास घेवून देशभर फिरत होते
दोन वर्ष ते संपर्कात होते मात्र परिवारात आले नव्हते. साधूच्या वेशात ते देशभर फिरत होते. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरु असलेल्या वुैंभमेळातही ते सहभागी झाले. गुरुवार 14 रोजी नरखेड – भुसावळ पॅसेंजरमध्ये त्यांचे मृतदेह असल्याची माहिती मिळाल्यावरुन रेल्वे पोलिसांनी त्यांचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात आणला. तेथे आधारकार्डवरुन त्यांची ओळख पटली. पोलिसांनी संपर्वै साधून नातेवाईकांनी बोलविले. बीड येथून त्यांचे मेहुणे डॉ. औदुंबर नालपे, मामा अण्णासाहेब लहाने हे जळगावात संध्याकाळी दाखल झाले.
सोशल मिडीयातून होते संपर्कात
सुरेश जाधव हे त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरुन नातेवाईक व मित्र परिवाराशी संपर्कात होते, अशी माहिती डॉ.नालपे यांनी दिली. जाधव यांना पत्नी निता, 10 वर्षाचा मुलगा जय, आई आसराबाई, भाऊ सुभाष असा परिवार आहे. शेवटचे बोलणे झाले त्यावेळी ते उत्तराखंड मध्ये असल्याची माहिती लहाने यांनी दिली. तसेच बीड मध्ये असे अनेकांसोबत अतिरिक्त ठरविण्याचा प्रकार सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.