पुणे : जम्मू-काश्मीरमधील पंपोर येथे भारतीय लष्कराच्या वाहनांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी शनिवारी भ्याड हल्ला केला होता. या हल्ल्यात तीन भारतीय जवान शहीद झाले होते. या तीन शहीद जवानांमध्ये पुण्याचे सुपुत्र लान्सनायक सौरभ नंदकुमार फराटे यांचा समावेश आहे. 32 वर्षांचे सौरभ फराटे यांना वीरमरण आले आहे. या वृत्तानंतर ते राहत असलेल्या गुरूदत्त कॉलनी, गंगानगर, फुरसुंगीसह संपुर्ण पुणे जिल्ह्यावर शोककळा पसरली. त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. शहीद सौरभ यांच्या पार्थीवावर आज सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. काही दिवसांपुर्वीच शहीद सौरभ फराटे 2 महिन्यांच्या सुट्टीवर घरी आले होते. 24 ऑक्टोबरला आरोही, आराध्या या जुळ्या मुलींचा पहिला वाढदिवस त्यांनी कुटूंबासह आनंदात साजरा केला. 9 डिसेंबर रोजी पुन्हा आपल्या कर्तव्याला रुजू झाले. परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते. शनिवारी जम्मू-काश्मीरमधील पंपोर येथे भारतीय लष्कराच्या वाहनांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला होता. या हल्ल्यात शहीद झालेल्या तीन जवानांमध्ये सौरभ फाराटे यांचा समावेश आहे.
हडपसर फुरसुंगी परिसरात पसरली शोककळा
सौरभ फराटे शहीद झाल्याचे वृत्त समजताच हडपसर फुरसुंगी परिसरात शोककळा पसरली होती. सौरभ यांचे वडील नंदकुमार फराटे यांना आपल्या वीर मुलाच्या आठवणी सांगताना आश्रु अनावर झाले होते. ते म्हणाले, ‘लहानपणापासूनच सौरभच्या मनात देशासाठी काहीतरी करण्याची जिद्द होती. त्याला डान्स आणि बॉक्सिंगची खूप आवड होती. या घटनेनंतर सरकारने योग्य पावले उचलावीत,’ असे ते म्हणाले. तर शहीद सौरभ यांचे सासरे मनोहर भोळे म्हणाले, ‘दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर देण्याची वेळ आली आहे. जवानांना संरक्षण मिळाले पाहिजे. सरकारने याबाबत निर्णय घेतला पाहिजे. अशा घटनांमुळे देशाचे खूप नुकसान होत आहे. त्यामुळे वेळीच सरकराने पावले सरकारने उचलावीत.’ भोळे यांनी या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेधही व्यक्त केला.
लहानपणापासून देशसेवा करण्याची सौरभची होती इच्छा
सुरुवातीला राहुल कॉलनी येथे भाड्याने हे कुटुंब राहत होते, वडील किर्लोस्कर कंपनीत कामाला होते तर आई मंगल या गृहिणी आहेत. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना सौरभ सैन्यात भरती झाले. त्यांचा लहान भाऊ रोहीत देखील भारतीय सैन्यात कार्यरत आहे. रोहितला प्रथम माहिती समजल्यानंतर त्याने वडिलांना मोबाईल वरून कळविले.
फराटे कुटूंबिय मूळ मांडवगण फराटे येथील आहेत. देशाकरीता काम करण्याची इच्छा सौरभला शालेय जीवनापासूनच होती. त्याने बारावीची परीक्षा हडपसर येथील अण्णासाहेब मगर महाविद्यालयात दिली. त्यानंतर सैन्यात भरती होण्याकरिता अनेक वेळा प्रयत्न केले. अखेर 2004 साली बारामती येथे झालेल्या भारतीमधे त्याची निवड झाली. भारतीय सैन्य दलात 13 वर्षात ओडिशा, नाशिक, मुंबई व जम्मू काश्मीर अशा विविध ठिकाणी लष्करी सेवा बजावत होता.
सौरभचे स्वप्न अपुर्ण
सैन्यात भरती झाल्यानंतर 2009 साली सौरभ यांचा विवाह सोनाली यांच्याशी झाला होता. सोनाली यांचे वडीलही सैन्यात कार्यरत होते. सात वर्षानंतर दोन जुळ्या मुली झाल्या. काही दिवसापुर्वी नवे घर घेण्यासाठी सैन्यातील हे दोघे भाऊ सुट्टी घेऊन घरी आले होते. यावेळी त्यांनी घरासाठी कर्ज प्रकियाही पुर्ण केली होती. दोन भावांसाठी घर व्हावे त्यांची इच्छा होती. परंतु सौरभचे हे स्वप्न अपुर्ण राहिले.
सोमवारी सकाळी आठ वाजता त्यांच्या राहत्या घरापासून अंत्ययात्रा निघणार आहे. पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. घरापासून गंगानागरमार्गे अंत्ययात्रा काढण्यासाठी गाडी सजविण्यात आली आहे. चौथरा बांधला जात आहे. राडारोडा काढून मैदान स्वच्छ केले जात आहे. अंत्यविधीला मुख्यमंत्र्यांसह राज्यातील मोठे नेते उपस्थित राहणार आहेत. येथील चौका चौकात अमर रहेचे फलक लावले असून नागरिकांनी परिसरातील दुकाने बंद ठेवली होती.
-सचिन हरपळे, स्थानिक ग्रामपंचायत सदस्य
शरद पवार यांच्याकडून सांत्वन
राष्ट्रवादीचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरद पवार कार्यक्रमानिमित्त हडपसर परिसरात आले होते. हे वृत्त समजल्यावर त्यांनी शहीद जवान सौरभ फराटे यांचे वडील नंदकिशोर फराटे व सासर्यांची भेट घेऊन सांत्वन केले. शरद पवार यांनी सविस्तर माहिती घेऊन मदत करण्याचे आश्वासन दिले.