मुंबई व उपनगरांत गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असून, हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही तासांत अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला आहे. मुसळधार पावसाने मुंबई व ठाणेकरांना 26 जुलै 2005 या दिवसाची आठवण करून दिली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाला भेट देऊन आपत्कालीन परिस्थितीचा आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांनी लोकांना आवाहन केले आहे की, अत्यंत गरजेचे असेल तर घराबाहेर पडा. मुंबई महापालिकेने आपत्कालीन परिस्थिती घोषित केली आहे. एनडीआरएफच्या तीन टीम मुंबईत आपत्कालीन परिस्थितीशी लढण्यासाठी तयार असून, पुण्याहून आणखी तीन टीम रवाना झाल्या आहेत. मुंबईकरांसाठी नेहमी धावणार्या डबेवाल्यांची डबे पोहोचवण्याची सेवा विस्कळीत झाली आहे.
गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर आगमन केलेल्या पावसाने गेले दोन दिवस मुंबईला झोडपण्यास सुरुवात केली असून, मुंबईच्या गल्लोगल्ली तळे साचल्यासारखी परिस्थिती झाली आहे. लालबाग, हिंदमाता, परळ भागात पाणी साचले असून रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले आहे. गेल्या काही तासांत 152 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. घाटकोपर, कुर्ला, अंधेरी, बांद्रा, दादर या भागांत सर्वत्र पाणी साचले आहे. पावसामुळे अनेक कार्यालयांना सुट्ट्या देण्यात आल्या. सर्व कामे ठप्प झाली आहेत. मुंबई आणि परिसरातील अतिवृष्टीमुळे महावितरणने काही ठिकाणी संभाव्य धोका लक्षात घेऊन वीजपुरवठा बंद केला आहे. ठिकठिकाणी पाणी तुंबल्याने मुंबई व उपनगरात पडलेला ताण वाढू नये म्हणून बाहेरून येणार्या गाड्यांना बंदी करण्यात आली आहे. पावसाने उद्भवलेली परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत मुंबई एन्ट्री पॉइंटवरील टोलवसुली बंद करण्यात आली आहे. सी लिंकवरही टोल घेतला जाणार नाही असे ट्वीट मुख्यमंत्र्यांनी केले आहे. मुंबईतील सायन-पनवेल हायवे, ठाणे 5 बेलापूर हायवे, शिळफाटा मार्गया सर्व ठिकाणी वाहतूककोंडी निर्माण झाली आहे. हार्बर रेल्वेची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. अनेक रेल्वेस्थानकांमध्ये पावसाचे पाणी शिरले असून, त्यांना नद्यांचे स्वरूप आले आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईतील स्कूल बसेस बंद राहणार आहेत. पावसाचा हवाई वाहतुकीवरही परिणाम झाला असून विमानांची उड्डाणे उशिराने होत आहेत. 26 जुलै 2005 रोजी मुंबई व उपनगरांत सुमारे 900 मि.मी. पाऊस पडला होता. त्यावेळी मुंबई व परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले होते.
त्या पावसात अनेकांनी आपले नातेवाईक गमावले तर कुणी कुटुंबाला पारखा झाला. यावेळी त्या 26 जुलैची आठवण लोकांना येत आहे. 26 जुलैच्या पावसात मुंबई व उपनगराचे मोठे आर्थिक, सामाजिक नुकसान झाले होते. मोठी जीवितहानी झाली होती. मुंबई व उपनगरातील सध्या पडत असलेल्या मुसळधार पावसाची दखल यावेही महापालिका व राज्य सरकारने घेतल्याचे दिसते तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राज्य सरकारला सूचना देऊन वेळ पडल्यास नाविक दलाचे साहाय्य देण्याबाबत सांगितले आहे. यासाठी जवान व पाणबुडी तैनात ठेवण्यात आली आहे. मुंबई महापालिका दरवर्षी पावसाळ्यापूर्वी आवाहन करते की, आम्ही आपत्कालीन परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी तयार आहोत.
-अशोक सुतार
8600316798