अतिवृष्टी होण्याची शक्यता

0

तळेगाव दाभाडेः हवामान खात्याच्या अंदाजानुसार अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सर्वत्र संततधार पाऊस असल्याने भूस्खलन होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या गावांना तसेच पुरामुळे नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा त्या परिसरातील संबधित पोलीस ठाण्याने द्यावा असा आदेश पुणे ग्रामीण सुरक्षाशाखेने संबधित पोलीस ठाण्यांना लेखी कळविला आहे.

पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयातर्फ़े जिल्ह्यात चालू असलेल्या अतिवृष्टीमुळे पूर आणि भूस्खलन होण्याची शक्यता लक्षात घेऊन, पुणे ग्रामीणमधील पोलीस ठाण्यांनी आपत्कालीन साधनांसह तयार राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. तसेच डोंगर व नदीकाठच्या गावांतील नागरिकांनाही सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे. धरणातून पाणी सोडल्यामुळे तसेच ओढ्या नाल्यांतील पाण्यामुळे पूर येऊन, नदीकाठच्या गावांना पुराचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यानुषंगाने पुणे ग्रामीणमधील सर्व पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी आपले पोस्टला आपत्कालीन साधने तयार ठेऊन, जवानांना सतर्क ठेवावे.तसेच नदीकाठच्या गावांना, वस्त्यांना सावधानतेचा इशारा देऊन सतर्क करावे. पूरनियंत्रण योजनेप्रमाणे कार्यवाही करुन अहवाल सादर करण्याचे आदेश पुणे ग्रामीणच्या सुरक्षा शाखेतर्फे सोमवारी (ता.16) दुपारी काढलेल्या पत्रकाद्वारे देण्यात आले आहेत.