रावेर। महाराष्ट्रातील अतिसंवेदनशील शहरांच्या यादीत जळगाव जिल्ह्यातील रावेरचा समावेश आहे. अतिसंवेदनशील हा शिक्का पुसण्यासाठी सर्व समाजातील नागरिकांनी एकत्र येऊन सण-उत्सव साजरे करावेत, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी शांतता समितीच्या बैठकीत केले. सोमवार, 28 रोजी बैठक झाली.
कायदा-सुव्यवस्थेसाठी चोख बंदोबस्त
सध्या गणेशोत्सव सुरू असून छोट्या-मोठ्या दुर्घटना, काही अनुचित प्रकार घडू नयेत तसेच बेकायदेशीर जमाव जमा होऊ नयेत या करीता जळगाव-रावेर पोलिसांनी कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने परिपुर्ण असा बंदोबस्त आणि व्यवस्था केलेली आहे.
उपद्रवींवर स्पेशल कॅमेरा व्हॅनची नजर
उपद्रवी, टवाळखोर आणि समाजकंटक जमावावर बारीक लक्ष ठेवण्यासाठी जळगाव जिल्हा पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे, अपर पोलीस अधीक्षक बच्चनसिंग, फैजपूर उपविभागीय पोलीस उपअधीक्षक राजेंद्र रायसिंग यांनी स्पेशल इक्विपमेंट लोडेड कॅमेरा व्हॅन रावेर पोलीस स्टेशनला उपलब्ध करून दिली आहे. नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक नरेंद्र पिंगळे यांच्यासह त्यांच्या पोलीस कर्मचार्यांना या व्हॅनद्वारे टवाळखोरांवर बारकाईने लक्ष ठेवता येणार आहे. या व्हॅनमध्ये अत्याधुनिक पंप एक्शन गन नावाची बंदूक, दारूगोळा तसेच व्हिडिओ कॅमेरा आहे.
पोलिसांचा तिसरा डोळा
या व्हॅनचा कैमेरा अतिशय दर्जेदार असून चारही दिशांना एकाच वेळी व्हिडीओग्राफीक चित्रीकरण करून जमाव तसेच गर्दीतील सर्वांचे फोटो घेऊ शकतो. त्यामुळे आता अनुचित प्रकार घडवू पाहणार्या समाजकंटक तसेच सुव्यवस्था बिघडविण्यास कारणीभूत टवाळखोरांवर रावेर पोलिसांची नजर राहणार आहे. समाजकंटक आणि टवाळखोर तसेच चोरांना नजरकैद करण्यासाठी रावेर पोलिसांचा तिसरा डोळा यानिमित्ताने सक्रीय होऊन कार्यरत झाला आहे. शहरात राज्य राखीव पोलीस दल, केंद्रीय निमलष्करी दल, जिल्हा पोलीस दलाच्या तुकड्या दाखल होऊन गस्त देत आहेत.