पुणे । प्रतिनिधी । चित्रपट निर्माते अतुल तापकीर यांनी पत्नीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. त्यांच्याविरोधात काही महिन्यांपूर्वी पत्नीने पोलिसांकडे तक्रार केली होती. मात्र पोलिसांनी सुटकेसाठी दहा हजार रुपये मागितले होते. ते पोलीस कोण होते, त्यांची आता चौकशी होणार आहे. पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
अतुल तापकीर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी फेसबुकवर सुसाईड नोट लिहिली. यामध्ये आपण पत्नीच्या त्रासाला कंटाळून जीवन संपवत असल्याचे त्यांनी म्हटले होते. तसेच याच सुसाईड नोटमध्ये त्यांनी पोलिसांनी आपल्याकडून लाच घेतल्याचाही उल्लेख केला आहे. त्या लाचखोर पोलिसांची चौकशी करण्याचे आदेश पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी दिले आहेत.
ढोल ताशा सिनेमाच्या अपयशानंतर कर्जबाजारीपणा आला. पण यातून सावरण्यासाठी वडिलांनी, बहिणींनी मदत केली. मात्र पत्नी प्रियंकाने आपल्याला सतत त्रास द्यायला सुरुवात केली. वडिलांना आणि मला मानसिक त्रास दिला, याच उद्विग्नतेतून मी जीवन संपवत आहे, अशी फेसबुक पोस्ट अतुल तापकीर यांनी आत्महत्येपूर्वी लिहिली आहे. दरम्यान, अतुल तापकिर यांच्या या फेसबुक पोस्टमुळे पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी संबंधित लाचखोर पोलीस कोण आहेत? याचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत.