अत्याचाराचा आरोप असलेल्या पोलिसांकडेच तपास!

0

मुंबई । पोलिसांवर गंभीर आरोप करणार्‍या दिल्लीतील 24 वर्षीय मॉडेल आणि 16 वर्षाच्या नेपाळी मुलीचा शोध घ्यावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने पुणे पोलिसांना दिले आहेत. आरोप करणार्‍या पीडित मुलींना जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडण्यात आले होते. शंभर जणांनी बलात्कार केल्याचा आरोप या मुलींनी केला होता. बलात्कार करणार्‍यांमध्ये पोलीस अधिकारी असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.

पुण्यात 100 जणांनी बलात्कार केल्याची होती तक्रार
नेपाळी मुलीने तीच्या जबानीत जवळपास 100 जणांनी बलात्कार केल्याची आणि त्यात पोलिसांचाही समावेश असल्याची तक्रार केली होती. दिल्लीमधील 24 वर्षीय मॉडेल तरुणीवर बलात्कार झाल्याचे प्रकरण मार्च 2016 मध्ये समोर आले होते. पीडित तरुणी दिल्लीतील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली होती. त्यावेळी तिच्यावर बलात्कार केल्याचे समोर आले होते. रोहित भंडारी या नराधमाने चित्रपटात काम देण्याचे आमीष दाखवत तिला पुण्यात आणले होते. पीडितेला पुण्यातील एका घरात डांबून तिला सिगारेटचे चटके दिले. तसेच तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता. 16 वर्षाच्या नेपाळी मुलीवरही बलात्कार झाला होता असे तिने म्हटले होते. या आधारे गुन्हा दाखल झाला होता.

पीडित मॉडेल तरुणी आणि 16 वर्षाची मुलगी बेपत्ता आहेत
गेल्या सहा महिन्यांपासून पीडित मॉडेल तरुणी आणि 16 वर्षाची मुलगी बेपत्ता आहेत. या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडून सीबीआयकडे सोपवावा असा अशी मागणी दिल्लीतील अनुजा कपूर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिकेद्वारे केली होती. या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली. याचिकेतील आरोप हे गंभीर स्वरुपाचे असून पीडित तरुणी कुठे आहेत याची चिंता वाटत आहे. त्यामुळे त्यांचा शोध घेण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करा अशा शब्दात उच्च न्यायालयाने पोलिसांना फटकारले.

आरोप असलेले पोलिसच न्यायालयत होते हजर
न्या. रणजित मोरे आणि रेवती डेरे यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले आहेत. सुनावणीदरम्यान ज्या पोलिसांचा आरोपींच्या यादीत समावेश आहे ते पोलीस सरकारी वकिलांना माहिती देत होते. यावरुनही उच्च न्यायालयाने पोलिसांना फटकारले. असे असेल तर ती गंभीर बाब आहे. पुढील सुनावणीला पोलीस उपायुक्त दर्जावरील अधिकार्‍यांनी उपस्थित राहावे, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

आरोपी पोलीसच तपासासाठी गेलेे
सेक्स रॅकेटद्वारे पुण्यात आलेल्या मुलींशी पुणे पोलिसांचेच संबंध असल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आला. विशेष म्हणजे, या मुली हरवल्याचा तपास त्या मुलींचे ग्राहक असलेले पोलीसच करत आहेत. आरोपी असलेले पोलीसच केसचा तपास करत असल्याने, उच्च न्यायालयाने संताप व आश्चर्य व्यक्त केले. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी उच्च न्यायालयाने पुणे पोलीस आयुक्तांना पोलीस उपायुक्त दर्जाचा अधिकारी नियुक्त करण्याचे निर्देश दिले.