डॉ. ललितकुमार धोका यांनी केले मार्गदर्शन
आकुर्डी : लहान मुलांवर होणार्या अत्याचाराच्या घटनेत वाढ होत आहे. समाजाच्या या विकृत रुपाला आवर घालणे आवश्यक आहे, असे मत बालरोगतज्ञ डॉ.ललितकुमार धोका यांनी व्यक्त केले. रोटरी क्लब ऑफ चिंचवड, समाजसेवा केंद्र, पिंपरी-चिंचवड डॉक्टर्स असोसिएशन, रोटरी क्लब ऑफ पिंपरी आणि इनरव्हील क्लब ऑफ पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी-चिंचवडकरांच्या सदृढ आरोग्यासाठी आरोग्य व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना ते बोलत होते. या व्याख्यानमालेत आरोग्य विषयातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. आकुर्डी येथील समाजसेवा केंद्रात दि.5 ते 7 दरम्यान ही व्याख्यानमाला पार पडणार आहे. व्याख्यानमालेचे उद्घाटन शुक्रवारी ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी रोटरी क्लब ऑफ चिंचवडचे अध्यक्ष मल्लिनाथ कलशेट्टी, सचिव बाळकृष्ण खंडागळे, पिंपरी-चिंचवड डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.संजीव दातेत्ये, रोटरी क्लब ऑफ पिंपरीचे अध्यक्ष नितीन ढमाले, इनरव्हील क्लब ऑफ पिंपरीच्या अध्यक्षा मनीषा समर्थ आदी उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ बालरोगतज्ञ डॉ. अच्युत कलंत्रे यांना रोटरी धन्वंतरी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
शोषण म्हणजे नक्की काय
हे देखील वाचा
डॉ. ललित कुमार धोका म्हणाले की, लैंगिक अत्याचार झाल्यावरच शोषण झाले असे म्हणायचे का, हा प्रश्न समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. लहान मुलांना आपल्यावर झालेल्या अन्यायाला आणि संकटाला तोंड देता येत नाही. अत्याचार झालेल्या मुलाने आपल्यावरील अत्याचाराबाबत कोणाकडे तक्रार मांडली तरी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. त्या मुलावर कोणत्या प्रकारचे अत्याचार झाले आहेत, हे सुध्दा पाहिले जात नाही. पीडित मुलाला किंवा मुलीला आल्याचारानंतर अत्यंत वाईट परिस्थिला सामोरे जावे लागते. बेदम मारहाण, लैंगिक शोषण, छेडछाड, अपहरण, अर्भकांना बेवारस सोडून देणे, त्यांच्याशी अश्लिल भाषेत बोलणे अशा प्रकारे लहान मुलांचे शोषण केले जाते. ज्या कृत्याद्वारे मुलाच्या किंवा मुलीच्या शरीराला इजा पोहोचेल असा स्पर्श आणि अशी कोणतीही कृती, भाषण, वर्तन ज्यामुळे ते मूल घाबरेल, लज्जित होईल, अवमानित होईल हे सर्व बालकाच्या शोषणा अंतर्गत मोडते. तसेच अशी कोणतीही कृती किंवा दुर्लक्ष ज्यामुळे मुलांची निकोप वाढ होण्यास बाधा येईल. एकलकोंडे पडल्याचा भास हाईल. ही सर्व कृत्ये बालकांच्या शोषणा अंतर्गत येतात. बालकाला कोणत्याही प्रकारची शारीरिक इजा करणे. डाग देणे, जाळणे, मारणे, गुद्दे घालणे, लाथा मारणे, छडीचा मार, मुलाला गदगदा हालविणे किंवा मुलाला इजा पोहोचेल अशा वर्तनाने त्याचे शारीरिक शोषण होते. वयाच्या 5 वर्षापासून 12 वर्षापर्यंतच्या मुलांना शोषणाचा व त्यांच्याशी गैरवर्तन केले जाण्याचा सर्वात जास्त धोका असतो.
प्रबोधन झाले पाहिजे
सत्काराला उत्तर देताना डॉ.अच्युत कलंत्रे म्हणाले की, आरोग्य व्याख्यानमालेच्या निमित्ताने समाजाचे प्रबोधन झाले पाहिजे हा मूळ उद्देश डोळ्यांसमोर ठेवून ही व्याख्यानमाला घेण्यात आली. पुरस्कार मिळण्याइतपत मी मोठा नाही. मी मोठा झालो ते रोटरीतील माझ्या मित्रांमुळे असे त्यांनी नमूद केले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले. सूत्रसंचालन दीपाली पाटेकर यांनी केले.